औरंगाबाद : शहरात काल रात्री झालेल्या जोरदार पावसाने नाल्या तुडूंब भरून वाहत होत्या. याचवेळी सिडको एन- ६ येथून घराकडे बुलेटवर घराकडे निघालेल्या चेतन चोपडे यांचा गाडीसह नाल्यात पडल्याने मृत्यु झाला. या प्रकरणी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली. यातच आज सकाळी एका नागरिकाने या ठिकाणची पाहणी करण्यासाठी गेलेले अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या कानशिलात लगावली.
शहरातील जय भवानी नगर येथे नाल्यात पडून भगवान मोरे यांच्या मृत्यूला चोवीस तास होण्याच्या आतच सिडको एन-६ येथे काल रात्री चेतन चोपडे या तरुणाचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. रात्री पावसात घराकडे परतत असताना चेतन बुलेट गाडीसह नाल्यात पडल्यानं ही दुर्घटना घडली.
दोन दिवसात नाल्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. यातच सिडको येथे नाल्याची पाहणी करण्यास मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग गेले असता एका नागरिकाने त्यांच्या कानशिलात लगावली.