औरंगाबाद: मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ७० गटांची आरक्षण सोडत गुरुवारी जाहीर झाली. या सोडतीत हक्काचे गट राखीव झाल्यामुळे जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्षांसह अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांचा गट ओबीसी पुरुष राखीव झाला, तर उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड यांचा गट सर्वसाधारण महिला राखीव झाला आहे. शिक्षण समिती सभापती अविनाश गलांडे यांचा महिला राखीव झाला आहे. त्यामुळे या सर्वांना दुसऱ्या गटाचा शोध घ्यावा लागणार आहे. विद्यमान आमदार तथा तत्कालीन जि.प. सदस्य रमेश बोरणारे यांचाही गट महिला राखीव झाला आहे.
विलास भुमरे, रमेश गायकवाड, श्रीराम महाजन, केशव तायडे, शिवाजी पाथ्रीकर, जितेंद्र जैस्वाल या दिग्गजांचेही गट हुकले आहेत. देवयानी डोणगावकर यांचा गट ओबीसी महिला झाला असला तरी त्यांच्याकडे ओबीसीचे प्रमाणपत्र असल्यामुळे त्यांचा गट वाचला आहे, असे म्हणता येईल.