औरंगाबाद : जि.प.च्या पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केल्यानंतर विविध संघटनांनी एकत्रित येऊन उद्यानात बेकायदेशीर बैठक घेतली. तेथे पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य केले व कर्मचाऱ्यांना भडकावले. त्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना गुरुवारी नोटिसा बजावण्यात आल्या, त्या बैठकीला उपस्थित सुमारे अडीचशे कर्मचाऱ्यांनाही नोटिसा बजावल्या जाणार आहेत, असे सीईओ मधुकरराजे आर्दड यांनी सांगितले.
जि. प. प्रशासनाने पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केल्यापासून जिल्हा परिषदेत वातावरण तंग आहे. कर्मचारी संघटनांनी उद्या ६ एप्रिलपासून लेखणीबंदचा इशारा दिलेला आहे. जवळपास अडीचशे कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन मंगळवारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कापसे तसेच आर्दड यांना देण्यात आले होते. शुक्रवारी आणखी ‘सीईओं’ची भेट घेण्याचा प्रयत्न पदाधिकारी करणार आहेत.
‘सीईओ’ आर्दड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कामकाज बंद करायला भाग पाडून पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. तेथे चिथावणीखोर भाषण केले. याचे पुरावे आपल्याकडे आहेत. निलंबित कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला असेल, तर त्यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील करावे. कर्मचाऱ्यांना कामापासून रोखणे हा गुन्हा आहे. अधिकाऱ्यांवर हल्ले झाले तेव्हा कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला होता, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, त्यावेळी आम्ही त्यांच्यासोबत होतो. आताही या कर्मचाऱ्यांना कोणी बाहेरच्या घटकाने हात लावला, तर प्रशासन प्रमुख म्हणून मी त्यांच्यासोबत राहील.
पीरबावडा प्राथमिक उपकेंद्रात प्रसूतीसाठी एक महिला गेली. त्यावेळी उपकेंद्राला कुलूप होते. ती महिला उपकेंद्र परिसरातच बाळंत झाली. याप्रकरणी आरोग्य सेवक मानकापे यांना निलंबित केले. फुलंब्रीचे आरोग्य अधिकारी विखे पाटील, वडोदबाजार वैद्यकीय अधिकारी डॉ. सावंत, पीरबावडाच्या महिला आरोग्य सहायक कदम, काळे, राठोड, आरोग्य सेवक पठाडे यांना नोटिसा बजावल्या आहेत.