औरंगाबाद : शहरातील विविध समस्यांसाठी अनेक संघटना आणि समित्या कार्यरत आहेत. यामध्ये आणखी एका समितीची भर पडली आहे; परंतु आतापर्यंतच्या सगळ्या समित्यांपेक्षा ही समिती काहीशी वेगळी आहे. ही समिती आहे वाहन चोरीने त्रस्त झालेल्या नागरिकांची. ‘वाहनचोर त्रस्त आंदोलन समिती’ असे तिचे नाव आहे.
शहरात सध्या दुचाकी चोरांचा सुळसुळाट झाला आहे. दररोज किमान ३ ते ४ वाहने चोरीला जात आहेत. विविध पोलीस ठाण्यांत यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत; परंतु वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश येत नसल्याचे दिसते. याविषयी वाहनमालकांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे. पोलीस प्रशासन कारवाईच्या नावाखाली केवळ वेळ काढूपणा करीत असून ‘वजनदार’ व्यक्तीचे वाहन तात्काळ सापडते आणि सर्वसामान्यांचे वाहन सापडत नाही, अशी ओरड होत आहे.
या सगळ्या विरोधात आता वाहन चोरीने त्रस्त झालेले नागरिक एकजूट झाले आहेत. चोरीला गेलेले वाहन परत मिळविण्यासाठी प्रशासनाविरोधात आवाज बुलंद केला जात आहे. शहरामध्ये दुचाकी सांभाळणे अवघड झाले आहे. दररोज दुचाकी चोरीला जात आहेत. चोरीला गेलेल्या दुचाकी सापडण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही ठिकाणी दुचाकी चोर दिसून येतात; परंतु ते पोलिसांच्या हाती लागत नाहीत.
आधी निवेदन, नंतर आंदोलनमाझी स्वत:ची बुलेट चोरीला गेली. संशयित, सीसीटीव्ही चित्रीकरण उपलब्ध असूनही वाहन शोधण्याकडे दुर्लक्ष होतेय. माझ्यासह अनेकांना हाच अनुभव येतो. त्यामुळे समिती स्थापन केली. यासंदर्भात आधी पोलिसांना निवेदन दिले जाईल. त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरविली जाईल, असे समितीचे अध्यक्ष राहुल देशमुख म्हणाले.