४ एप्रिलपर्यंत शहरात प्रत्येक शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन पाळण्यात येणार असल्याची घोषणा प्रशासनाने केली आहे. शनिवारी सकाळी शहरातील प्रमुख चौकांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रत्येक नागरिकाची पोलीस चौकशी करताना दिसून आले. दुपारी ऊन तापू लागले त्यामुळे पोलिसांनाही सावली शोधावी लागली. दुपारी १२ ते ३ या वेळेत रस्ते अक्षरशः निर्मनुष्य झाले होते. दुपारी चार वाजेनंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवर दुचाकी आणि पादचाऱ्यांची संख्या काहीसी वाढली. रस्त्यावर अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांचे प्रमाण थोडे होते. बाजारात औषधी दुकान, पंक्चर, दूध विक्रेते, पालेभाज्या विक्रेत्यांची दुकाने उघडी होती. अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी असली तरी खरेदीसाठी कोणीही येत नसल्याचे दिसून आले. नेहमी गजबजलेले परिसर आज निर्मनुष्य दिसून येत होते. बुढीलेन, लोटा कारंजा, शाहगंज, सिटी चौक, गुलमंडी, टिळक पथ, औरंगपुरा, निराला बाजार, मिल कॉर्नर, पैठण गेट, क्रांतीचौक, टीव्ही सेंटर, गजानन महाराज मंदिर परिसर, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन आदी भागांत रस्ते निर्मनुष्य झाले होते.
चौकाचौकात क्रिकेट सामना
शहरातील रस्ते निर्मनुष्य होताच सकाळी आणि सायंकाळी बच्चे कंपनीने क्रिकेटचा आनंद लुटला. यामध्ये मोठ्या नागरिकांनीही नंतर भाग घेतला. मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये नागरिकांमध्ये प्रचंड भीती होती. यंदा भीतीची जागा दक्षतेने घेतली होती.
जिल्हाधिकारी, मनपा प्रशासक, पोलीस आयुक्त रस्त्यावर
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगरपालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी टीव्ही सेंटर चौक येथे भेट घेऊन लॉकडाऊनची संयुक्त पाहणी केली. पाण्डेय यांनी नंतर अण्णाभाऊ साठे चौक, आंबेडकर चौक, वसंतराव नाईक चौक, सिडको उड्डाणपूल, केंब्रिज चौक येथे भेटी देऊन लाॅकडाऊनची पाहणी केली. त्यांनी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या आणि उभे राहणाऱ्या नागरिकांची विचारपूस व चौकशी करा, त्यांना समजावून सांगा, त्यामुळे रविवारच्या लाॅकडॉऊनची अधिक चांगली अंमलबजावणी होईल, अशा सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या, तसेच रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या व फिरणाऱ्या नागरिकांचे त्यांनी समुपदेशन केले.