औरंगाबाद: मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात जनता पाण्यासाठी तरसत आहे. या शहराने शिवसेनेला खूप दिले पण शिवसनेने त्यांना काय दिले. हा मोर्चा व्यवस्था बदलण्यासाठी आहे. जनतेचा आक्रोश राज्य सरकारला खाक करेल, असा हल्लाबोल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज जल आक्रोश मोर्चात बोलताना केला.
औरंगाबाद शहरात पाण्याच्या प्रश्न बिकट झाला आहे. आठ ते दहा दिवसांनी होणारा अपुरा, कमी दाबाने होणार पाणीपुरवठा यामुळे नागरिक त्रस्त आहेत. पाणी समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रयत्न करत असून शहराच्या वाढलेल्या विस्तारामुळे अनेक अडचणी येत आहेत. शहरात पाणी प्रश्न सुटावा यासाठी भाजपने आज जल आक्रोश मोर्चा काढला आहे. याचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करत आहेत. यावेळी विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लबोल केला. ते म्हणाले, शहरासाठी १६०० कोटी रुपयांची पाणी पाणी पुरवठा योजना आमच्या काळात मंजूर करण्यात आली मात्र, ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगित केली. आता या योजनेचे काम संथ गतीने सुरु आहे. या वेगाने काम होत राहिले तर २५ वर्ष लागतील. हा मोर्चा भाजपाचा नसून जनतेचा आहे. जनतेचा आक्रोश राज्य सरकारला खाक करेल. शिवसेनेला शहराने खूप दिले पण त्यांनी शहराला काय दिले असा सवालही फडणवीस यांनी यावेळी केला.
हंडे घेऊन महिलांचा सहभाग मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. महिला रिकामे हंडे घेऊन मोर्चात सहभागी आहेत. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी केली. शहराचे, उद्योगांचे मोठे नुकसान पाणी प्रश्नामुळे होत असल्याच्या भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या.