औरंगाबाद,दि.30 : साडेतीन मुहूर्तापैकी एक संपूर्ण मुहूर्त असलेल्या दसरा या सणाला नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र, यंदा महिनाअखेरीस दसरा आल्याने व जीएसटी लागू झाल्यानंतरची मंदी अजूनही टिकून असल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेवर दिसून आला. बँकांच्या सुलभ अर्थसहाय्य जोरावर अनेकांनी नवीन वस्तू खरेदी केल्यामुळे बाजारात काही प्रमाणात वर्दळ दिसली. पण मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दस-याची खरेदी समिश्र राहिली.
सराफाबाजारात स्थिरता दस-याच्या मुहूर्तावर आवर्जून सोने खरेदी केले जाते. विशेषता: दागिण्यापेक्षा प्युअर सोने खरेदी जास्त प्रमाणात होत असते. मात्र, दस-याच्या मुहूर्तावर सकाळी नेहमी सारखी वर्दळ सराफा बाजारात दिसून आली नाही. दुपार नंतर बाजारात ग्राहकी दिसून आली. तेही नामांकित शोरुममध्येच. आज ३०६०० रुपये प्रतितोळा भावाने सोने विकल्या जात होते. अनेकांचा ग्राहकांची प्रतिक्षा करण्यातच दिवस निघून गेला.
नवीन १२०० दुचाकी, ५०० चारचाकी रस्त्यावरवाहनबाजारात वर्दळ दिसून आली. पासिंग शिवाय शोरुममधून वाहन देता येत नसल्याने बहुतांश खरेदीदारांनी आठवडाभर आधीच वाहनांची बुकींग करुन ठेवली होती. यासंदर्भात वितरक राहूल पगारिया यांनी सांगितले की, शहरातील सर्व कंपन्याच्या शोरुममधून सुमारे १२०० दुचाकी विक्री झाल्या. यात ४० हजार ते ६० हजार रुपये दरम्यानच्या दुचाकी सर्वाधिक विक्री झाल्या. यातही ५० टक्के स्कुटर व ५० टक्के मोटरसायकल असे विक्रीचे प्रमाण होते. चारचाकी वाहन बाजारात दिवसभरात शहरात ५०० कार विक्री झाल्या. यात ५ लाख ते १० लाखापर्यंतच्या ८० टक्के कार विकल्या गेल्या. अनेक जण शोरुममध्येच कारची पूजा करताना दिसून आले.
८० नवीन नवीन घराची बुकिंग क्रेडाईचे अध्यक्ष रवी वट्टमवार यांनी सांगितले की, यंदाच्या ‘ड्रिम होम’ गृहप्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. विविध बिल्डर्सकडे २५० ग्राहकांनी घर खरेदीची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर प्रत्यक्ष साईटवर भेट देऊन आज ८० जणांनी आज दस-याच्या मुहूर्तावर फ्लॅट, रोहाऊस, शोरुम खरेदी केले. येत्या दिवाळीपर्यंत रियल इस्टेट क्षेत्रात मागणी वाढणार आहे. कारण, आज अनेकांनी विविध साईटवर जाऊन पाहणी केली. तसेच बिल्डर्सच्या आॅफीसवर जाऊन अनेकांनी गृहप्रकल्पांची माहितीही घेतली आहे. याचा सकारात्मक परिणाम दिवाळीपर्यंत दिसून येईल.
इलेक्ट्रॉनिक्स बाजारात टिव्हीला मागणी इलेक्ट्रॉनिक्स बाजारात सकाळी खरेदी धिम्या गतीने झाली पण दुपार नंतर शहरातील विविध भागातील शोरूममध्ये वर्दळ वाढल्याचे दिसून आले. दस-याच्या मुहूर्तावर एलईडी टिव्ही खरेदीकडे अनेकांचा कल होता. काहींनी जुना टिव्ही देऊन नवीन टेक्नॉलॉजीचा एलईडी टिव्ही खरेदी करताना दिसून आले. यासंदर्भात टिव्ही डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अरूण जाधव यांनी सांगितले की, बँकांनी सुलभ अर्थसहाय्य दिले असल्याने त्याचा फायदा ग्राहकांनी घेतला. शहरात जे टिव्ही विक्री झाले त्यातील ८० टक्के टिव्हीसाठी ग्राहकांनी अर्थसहाय्य घेतले. मागील वर्षीच्या तुलनेत उठाव कमी होता.
३५०० मोबाईलची विक्री मोबाईल बाजारात दुपार नंतर ग्राहकांनी पाऊल ठेवले. रात्री ९ वाजेपर्यंत शहरात सुमारे ३५०० मोबाईल हँडसेट विक्री झाल्याचा अंदाज मोबाईल वितरक विकास सचदेव यांनी व्यक्त केला. मोबाईलमध्ये १५ ते २० हजार रुपयांदरम्याचे स्मार्ट हँडसेट जास्त विकल्या गेले. बँकांनी अर्थसहाय्य सुरु केल्याने त्याचाही चांगला परिणाम दिसून आला पण मागील वर्षीच्या तुलनेत उलाढाल निम्मी होती.