औरंगाबाद : शहरातील प्रमुख, अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. लाखो वाहनधारकांना खड्ड्यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. त्यानंतरही महापालिका प्रशासन दखल घ्यायला तयार नाही. त्रस्त नागरिक, व्यापारी, स्वयंसेवी संस्थांनीच आता स्वखर्चाने खड्डे बुजविण्याची मोहीमच सुरू केली आहे. विविध करांचा बोजा उचलणाऱ्या नागरिकांना आता खड्डे बुजविण्याचा आर्थिक भार सहन करावा लागतोय, हे विशेष.
महापालिकेकडे बाराही महिने खड्डे बुजविणारी यंत्रणा नाही. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी खड्ड्यांबाबत ओरड होते. गणेश महासंघ, राजकीय मंडळींना खूश करण्यासाठी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर मुरूम-माती टाकली जाते. यंदाही पावसाळा सुरू झाल्यापासून शहरातील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुख्य रस्त्यांवरून हजारो वाहनधारक ये-जा करतात. त्यांना या खड्ड्यांतूनच मार्ग काढावा लागतोय. विविध पक्ष, संघटना, नागरिकांनी मनपाकडे खड्डे बुजवा, म्हणून मागणीही केली. मात्र, या मागणीला महापालिकेला प्रशासनाने नेहमीप्रमाणे केराची टोपली दाखविली. कारण कोणत्या उपाययोजना दोन महिन्यांत केल्या नाहीत. त्यामुळे साहजिकच नागरिकांचा रोष वाढू लागला. आपला रोष व्यक्त करण्यासाठी नागरिकांना हक्काचा नगरसेवकही नाही. मुळात खड्डे बुजविण्याचे दायित्व महापालिकेचे आहे. या दायित्वापासून प्रशासन पळ काढतेय का, असा प्रश्न उपस्थित होतोय.
वॉर्ड कार्यालये गप्प का?महापालिका प्रशासनाने वॉर्ड कार्यालयांना खड्डे बुजविण्यासाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करून दिली आहे. वॉर्ड कार्यालये या निधीचा विनियोग करायला तयार नाहीत. शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि अंतर्गत रस्त्यांवरील एकही खड्डा बुजविण्यात आला नाही.
असा घेतला नागरिकांनी पुढाकार :१) हेल्प रायडर्स या तरुणांच्या ग्रुपने चार दिवसांपूर्वीच गजानन महाराज मंदिर ते त्रिमूर्ती चौकापर्यंतच्या जवळपास १०० खड्ड्यांमध्ये मुरूम आणून टाकले. त्यांना दहा हजार रुपये खर्च आला. त्यामुळे वाहनधारकांना किंचित दिलासा मिळाला.२) बीड बायपास रोडवरील मधुमालती कॉलनी ते प्रथमेश विहारपर्यंतच्या नागरिकांना मरण यातनाच सहन कराव्या लागत होत्या. शेवटी वर्गणी करून नऊ हजार रुपयांचा मुरूम आणून टाकला.३) मध्यवर्ती जकात नाका ते रोशन गेटकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर एक मोठा खड्डा पडला होता. बुधवारी या भागातील व्यापाऱ्यांनी स्वखर्चाने सिमेंट, वाळू आणून अडीच फूट रुंद, २० फूट लांब खड्डा बुजविला.