औरंगाबाद : जालंधर येथे पुढील महिन्यात होणाºया राष्ट्रीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी औरंगाबादचे आमेद खान, लिआॅन फर्नांडिस, अनिता शर्मा आणि आरती देहाडे यांची महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील हॉकी संघात निवड झाली आहे.आमेद खान हा फुलंब्री येथील संत सावता महाविद्यालयाचा विद्यार्थी असून, त्याने याआधीही राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना आपला विशेष ठसा उमटवला आहे. लिआॅन फर्नांडिस हा देवगिरी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. हे दोघेही आघाडीच्या फळीत खेळत असतात. अनिता शर्मा ही महिला महाविद्यालयाची आणि आरती देहाडे ही ज्ञानदीप विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. या खेळाडूंना राज्य क्रीडा मार्गदर्शक उमेश बडवे, रणजित पवार, उज्ज्वला सातदिवे, युसूफ शेख यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडीबद्दल हॉकी महाराष्ट्रचे उपाध्यक्ष पंकज भारसाखळे, प्रदीप खांड्रे, शेख साजीद, सय्यद आझम, श्यामसुंदर भालेराव, संजय तोटावाड आदींनी खेळाडूंचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
औरंगाबादचे आमेद, लिआॅन, अनिता, आरती यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 11:54 PM