प्रशांत तेलवाडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात गणेशमूर्तींची उंची वाढत आहे असा मथळा वाचून आपणास आश्चर्य वाटले असेल. काहींना तर चमत्कार झाला की काय, अशी भावनाही मनाला स्पर्श करून गेली असेल. मनात अनेक विचारांनी रुंजी घालणे सुरू केले असेल; पण डोक्यात निर्माण झालेल्या विचारांच्या चक्राला थांबवा. कारण, मुंबईतील उंच गणेशमूर्तींची क्रेझ आता मराठवाड्याच्या राजधानीमध्ये आली आहे. म्हणूनच तर दरवर्षी भव्य मूर्तींची संख्या वाढू लागली आहे. आपल्या गणेश मंडळाची मूर्ती अन्य मंडळांपेक्षा उंच असावी, या स्पर्धेमुळे दरवर्षी १५ फुटांपेक्षा उंच गणपतीची स्थापना केली जात आहे.मुंबईत २५ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या महाकाय गणेशमूर्ती बसविण्याची जुनी परंपरा आहे. कारण, तिथे समुद्र असल्याने भव्यदिव्य मूर्ती बसविल्या जातात; पण आता तिथेही मूर्तीचा आकार लहान असावा, असा तेथील काही समाजसेवी संस्थांनी जनजागृती सुरू केली आहे. आता मुंबईच्या धर्तीवर आपल्या शहरातही मोठ्या मूर्ती आणण्यास सुरुवात झाली आहे. दरवर्षी एक गणेश मंडळ १५ फुटांपेक्षा मोठी मूर्ती आणत आहे. मूर्तिकार स्व. रतनलाल बगले यांनी मागील शतकाच्या अखेरच्या वर्षांमध्ये तीन भव्य गणेशमूर्ती तयार करून आपल्या महान मूर्तिकलेची साक्ष पटवून दिली होती. शहरातील पहिली सर्वात मोठी १३ फूट उंचीची गणेशमूर्ती १९८१ मधील गणेशोत्सवात कुंवारफल्ली येथील जागृत गणेश मंडळाने बसविली होती. नंतरही मूर्ती विसर्जन करताना तिचे १९८५ मध्ये भव्य मंदिर उभारण्यात आले. यानंतर शहरात महाकाय मूर्ती बसविण्याची गणेश मंडळांमध्ये स्पर्धाच सुरू झाली. १९९२ मध्ये दिवाणदेवडी येथील पावन गणेश मंडळाने २१ फूट उंचीच्या मूर्तीची स्थापना केली व दोन वर्षाने म्हणजे १९९४ मध्ये चौराहा येथील सिद्धिविनायक गणेश मंडळानेही २१ फुटांचीच गणेश मूर्ती बसविली. या दोन्ही मंडळांनी मंदिर उभारून तिथेच या भव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. त्यानंतर शहरात अन्य मंडळांनी मोठ्या आकारातील मूर्ती आणल्या नाहीत.पण जवाहर कॉलनी येथील शहीद भगतसिंग मित्रमंडळप्रणीत जवाहरचा राजा प्रतिष्ठानने दहा वर्षांपूर्वी मुंबईतील ‘लालबागच्या राजा’ची प्रतिमूर्ती बसविली, तेव्हापासून दरवर्षी येथे लालबागच्या राजाची नवीन भव्य मूर्ती गणेशोत्सवात स्थापन केली जात आहे.यंदा साडेपंधरा फूट उंचीची मूर्ती येथे बसविण्यात आली आहे, तसेच १० वर्षांपूर्वी जाधवमंडी (बाबू मार्केट) जेथील अष्टविनायक गणेश मंडळाने मुंबईहून लालबागच्या राजाची मूर्ती आणणे सुरू केले. यंदाही येथे १५ फूट उंचीची लालबागच्या राजाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. दरवर्षी या दोन्ही मूर्तींचे कायगाव येथील गोदावरी नदीत विसर्जन करण्यात येते. ७ वर्षांपूर्वी धावणी मोहल्ल्यातील बालकन्हैया गणेश मंडळाने ११ फूट उंचीची बालगणेशाची भव्य आकर्षक मूर्ती गणेशोत्सवात आणली, तेव्हापासून याच मूर्तीची दरवर्षी गणेशोत्सवात स्थापना केली जाते.
औरंगाबादच्या गणेशमूर्तींची वाढतेय ‘उंची’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:50 AM