वाळूज महानगर (औरंगाबाद ): महापालिका प्रशासन पोलीस बळाचा वापर करुन बळजबरी शहरातील कचरा तिसगाव परिसरालगत टाकत आहे. त्यामुळे गावकर्यांनी कचर्याच्या गाड्या अडविण्यासाठी लाठ्या-काठ्या घेवून रणरागिणीसह चारही दिशेला कडा पहारा देवून येणार्या कचरा गाड्यावर पाळत ठेवली आहे. यासोबतच महापालिक ा प्रशासनाने नागरिकांचा विरोध मोडीत काढून बळजबरीने या भागात कचरा आणून टाकला तर आम्ही वाहनाच्या चाकाखाली झोपू वेळप्रसंगी आत्मदहन करू असा इशाराच गावकर्यांनी दिला आहे.
महापालिकेच्या नारेगाव येथील कचरा डेपोला त्या भागातील रहिवाशांनी तीव्र विरोध केला आहे. नारेगाव येथील कचरा डेपोत कचरा टाकणे बंद झाल्याने पंधरवाड्यापासून शहरात मोठी कचरा कोंडी झाली आहे. कचरा कोंडीमुळे न्यायालयाने महापालिका प्रशासनावर ताशेरे ओढताच कचर्याची विल्लेवाट लावण्यासाठी महापालिकेसह जिल्हा प्रशासनाकडून वाळूज महानगरातील तिसगाव, करोडी, वाळूज, गोलवाडी शिवारात जागेची शोधा शोध केली जात आहे. परंतू या परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर उतरुन या शिवारात कचरा टाकण्यास तीव्र विरोध केला आहे.
नागरिकांचा विरोध जुगारुन महापालिका प्रशासनाने शनिवार ३ मार्च रोजी मध्यरात्री पोलीस बळाचा वापर करुन गोलवाडी जकात नाक्याच्या पाठीमागील मोकळ्या जागेत शहरातील कचरा आणून टाकला. बळाचा वापर करुन कचरा टाकण्यास न्यायालयाने मनाई केली असतानाही यावेळी पोलीसांनी विरोध करणार्या नागरिकांवर लाठीचार्ज केला. या घटनेचे तीव्र पडसाड दुसर्या दिवशी उमटले. नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरुन औरंगाबाद-नगर महामार्गावरील साऊथसिटी चौकात मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाला जाणार्या लोकप्रतिनिधीच्या गाड्या आडवून त्यांना जाब विचारला. नागरिकांच्या संतप्त भावना लक्षात घेता पोलीसांनाही नरमाईची भूमिका घ्यावी लागली होती.
तिसगावकरांचा कडा पहारा महापालिका प्रशासन बळाचा वापर करुन तिसगाव शिवारात शहरातील कचरा आणून टाकित असल्याने गावकर्यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेतला आहे. कचरा टाकायला येणार्या वाहनांना अडविण्यासाठी हातातील काम-धंदे सोडून परिसरातील गोलवाडी फाटा, तिसगाव पाझर तलाव, खवड्या डोंगर व साजापूर चौफली या चारही दिशेला कडा पहारा ठेवून आहेत. मनपाच्या कचरा गाड्या रोखण्यासाठी तिसगाव परिसरातील रणरागिणीसह शेकडो तरुण व नागरिकांकडून लाठ्या-काठ्या घेवून गटा गटाने येणार्या कचरा गाड्यावर पाळत ठेवली जात आहे.
पहा व्हीडीओ : कचरा आणून टाकल्यास तिसगावाच्या संतप्त नागरिकांचा आत्मदहनाचा इशारा
संतप्त नागरिकांचा आत्मदहनाचा इशारा महापालिक ा प्रशासनाने नागरिकांचा विरोध मोडीत काढून बळजबरीने या भागात कचरा आणून टाकला तर आम्ही वाहनाच्या चाकाखाली झोपू वेळप्रसंगी आत्मदहनही करु असा इशारा खवड्या डोंगराजवळ पहारा देत बसलेल्या नागरिकांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिला.
गोलवाडी फाट्यावर भजनाचा कार्यक्रम शनिवारी मध्यरात्री नागरिकांचा विरोध जुगारुन महापालिका प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करुन गोलवाडी जकात नाक्यालगत लष्कराच्या जागेवर कचरा टाकला. पोलीस बळाचा वापर केल्याने चिडलेल्या आंदोलन कर्त्या नागरिकांनी कचरा टाकायला येणारी वाहने अडविण्यासाठी गोलवाडी फाट्यावर रविवार ४ मार्च रोजी रात्री म्हाडा कॉलनीतील सिद्धीविनायक पुरुष व महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम घेवून संपूर्ण रात्र जागून काढली. ह.भ.प. रतन बडवाल महराज, अशोक घोलप महाराज, शिवाजी जाधव महाराज, तर महिला भजनी मंडळाच्या संध्या अनपट, गिरी, मनिषा निकम, कापसे यांनी संचासह भजनाचा कार्यक्रम केला.