औरंगाबादेतून जाणाऱ्या मुंबई - नागपूर समृद्धी महामार्ग, सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्ग आणि औरंगाबाद - जळगाव या तिन्ही राष्ट्रीय महामार्गांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. या वर्षअखेरपर्यंत हे तिन्हीही महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू होणार असून, या शहराच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहेत.
नवीन बीड बायपास
वीस वर्षांपूर्वी शहरातील जालना रस्ता हाच एकमेव दळणवळणासाठी मुख्य मार्ग होता. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढली. अपघाताचे प्रमाण वाढले. त्यामुळे जालना रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून बीड बायपास रोड अस्तित्त्वात आला. परिणामी, जालना रस्त्यावरील वाहतुकीचा ताण काहीसा हलका झाला. मात्र, बीड बायपासलगत दोन्ही बाजूने शिवाजीनगर, देवळाई, सातारा परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहतीही उभ्या राहिल्या. त्यामुळे अलिकडे हा बायपासही जालना रस्त्यासारखाच अपघातांसाठी कुख्यात बनला. आता पुढील २५ वर्षांचे नियोजन करून सध्याच्या बीड बायपास रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून नवीन बीड बायपास रस्त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
साधारणपणे दीड पावणे दोन वर्षांपूर्वी सोलापूर - धुळे या राष्ट्रीय महामार्गाचा ‘सोलापूर - येडशी’ हा पहिला टप्पा व दुसऱ्या टप्प्यात ‘येडशी ते औरंगाबाद’ या महामार्गाचे काम पूर्ण करण्यात आले. सध्याचा जुना बायपास हा रस्ता आता शहरातीलच रस्ता झाला असून, वाहनांच्या वर्दळीमुळे या रस्त्यावरही अपघातांची संख्या वाढली. त्यामुळे सोलापूर - धुळे नवीन महामार्गासाठी नवीन बीड बायपास आकाराला आला. निपाणी, सातारा, वाल्मी, नक्षत्रवाडी आणि पुढे नगर - पुणे लिंक रोड मार्गे करोडी, माळीवाडा, कसाबखेड्याहून कन्नडकडे हा रस्ता जातो. या बायपासचे कामही अंतिम टप्प्यात आले असून, तो लवकरच वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे.
‘सुपर एक्स्प्रेस वे’ समृद्धी महामार्ग
समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून औरंगाबादच्या विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे. जिल्ह्यातून हा महामार्ग ११२ किलोमीटर लांबीचा गेला असून, तो औरंगाबाद, गंगापूर आणि वैजापूर या तीन तालुक्यांतील ७१ गावांमधून जात आहे. या महामार्गावर इस्पितळे, शीतगृहे, हॉटेल्स, नवीन शहरे, कौशल्य विकास शैक्षणिक केंद्रे या बाबी प्रस्तावित असून, लवकरच त्यासंबंधीची कामे सुरू होतील. या महामार्गामुळे औरंगाबादचा विकास अत्यंत गतीने होणार आहे. याचबरोबर येथील व्यापार, उद्योग, शेती क्षेत्राची भरभराट होण्याचा मार्गही या निमित्ताने मोकळा होणार आहे. या महामार्गामुळे औरंगाबादहून नागपूरला चार तासांत, तर मुंबईलाही तेवढ्याच वेळेत पोहोचणे शक्य होणार आहे. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी वरदान ठरणारा समृद्धी महामार्ग राज्यातील १२ जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांमधून जात आहे.
औरंगाबाद - जळगाव महामार्गाला गती
जागतिक वारसास्थळ असलेल्या अजिंठा लेण्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या १४७ किलोमीटर लांबीच्या औरंगाबाद - जळगाव राष्ट्रीय महामार्गाचे कामही आता ८० टक्के पूर्ण झाले आहे. भूसंपादनाच्या अडचणीमुळे या महामार्गाचे काम संथगतीने सुरू होते. आता तो अडथळाही काही दिवसांतच दूर होईल. देश-विदेशातील पर्यटकांसाठी हा चार पदरी महामार्ग सोयीचा ठरणार आहे. मोठ्या पुलांची कामे गतीने सुरू असून, चौका - अजिंठा घाटातील भूसंपादनाची अडचण दूर झाल्यास याही महामार्गाचे काम मार्गी लागणार आहे. हे काम पूर्ण झाल्यावर मराठवाडा हा उत्तर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाला जोडला जाणार आहे.