औरंगाबाद : शहरातील कचर्याची विल्हेवाट लावण्यात महापालिकेसह सर्व प्रशासकीय यंत्रणेला आलेले अपयश हे या शहराच्या प्रतिमेला हानिकारक असल्याच्या प्रतिक्रिया उद्योग वर्तुळातून उमटल्या आहेत. नव्याने गुंतवणूक होण्यावरदेखील या मुद्याचा परिणाम होऊ शकतो, अशीही शक्यता काहींनी वर्तविली.
२१ व्या दिवशीही शहरातील कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेसह शासनाने नियुक्त केलेल्या विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीला काहीही करता आले नाही. देश-विदेशात औरंगाबाद शहराची अस्वच्छ अशी प्रतिमा निर्माण झाली असून, याचे पडसाद वेगवेगळ्या पातळीवर उमटू शकतात, अशी भीती उद्योग वर्तुळातून व्यक्त होत आहे.
२१ दिवसांपासून शहर चर्चेतउद्योजक तथा मराठवाडा विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले, कचरा प्रकरणामुळे औरंगाबाद शहर मागील २१ दिवसांपासून चर्चेत राहिले ते के वळ कचर्याच्या विल्हेवाटीवरून. त्यामुळे शहराची प्रतिमा अस्वच्छ शहर म्हणून झाली आहे. त्याचे उद्योग, पर्यटनावर थेट परिणाम सध्या दिसत नसले तरी शहराची प्रतिमा मात्र डागळली आहे.
गुंतवणुकीवर परिणाम होईलनव्याने गुंतवणूक करणारे उद्योग शहराची पर्यावरण साखळीदेखील विचारात घेत आहेत. त्यामुळे औरंगाबाद शहरात कचर्यासारख्या ज्वलनशील प्रश्नावर उपाय शोधण्यात शासकीय आणि राजकीय पातळीवरील यंत्रणांना येणारे अपयश हे निश्चित परिणामकारक आहे. शहराची प्रतिमा डागळली असून, पर्यटनाच्या राजधानीचे जगभर नाक गेले आहे. औद्योगिक वसाहतीतील स्वच्छतेकडे मनपा अजूनही पूर्णपणे लक्ष देऊ शकलेली नाही, असे मत उद्योजक अर्जुन गायके यांनी व्यक्त केले.
उद्योगांकडून बोध घ्यावामनपासह इतर यंत्रणांनी उद्योगांकडून बोध घेतला पाहिजे. सर्व स्तरावर संघर्ष करून उद्योग सुरळीत चालविले जातात. मग पालिका सर्व सुविधा देण्यासाठी सुरळीतपणे का चालविली जात नाही. कचर्याच्या प्रश्नामुळे उद्योगांवर काही परिणाम होईल, असे वाटत नाही; परंतु औद्योगिक वसाहतींच्या स्वच्छतेकडे पालिका पाहिजे तसे लक्ष देत नाही. औद्योगिक वसाहती स्वच्छ ठेवण्यासाठी उद्योजक आपापल्या परीने प्रयत्न करतात. कचर्याच्या प्रक्रियेबाबत जगभरातील प्रयोग समजून घेतले पाहिजेत, असे मत मसिआ संघटनेचे अध्यक्ष सुनील किर्दक यांनी व्यक्त केले.