औरंगाबाद : चिकलठाणा येथील मिनी घाटी म्हणजेच जिल्हा सामान्य रुग्णालयावरील पाण्याचे संकट अद्यापही कायम आहे. महापालिकेकडून रुग्णालयास पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्याची तक्रार आ. अतुल सावे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सोमवारी केली.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या उद््घाटनाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. या रुग्णालयावर सोयी-सुविधा, यंत्रसामग्रीच्या प्रतीक्षेबरोबर पाण्याचे संकटही उभे आहे. दररोज दोन लाख लिटर पाण्याची मागणी राहणार्या या रुग्णालयाला पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही.
अपुर्या पाण्यामुळे रुग्णसेवा कोलमडण्याची भीती आहे. हे रुग्णालय लवकर कार्यान्वित करण्याची तयारी आरोग्य विभागाकडून सुरू आहे. त्यासाठी पुरेसे पाणी मिळणे आवश्यक आहे.आरोग्य विभागाने पाणीपुरवठ्यासाठी १६ लाख आणि भाड्यापट्टीपोटी १६ लाख रुपये महानगरपालिकेकडे भरले. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाणी जोडणी मिळाली; परंतु अत्यंत कमी पाणीपुरवठा होत आहे. रुग्णालय सुरू झाल्यानंतर पाण्याच्या संकटाला सामोरे जावे लागणार असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सामान्य रुग्णालयास कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची बाब पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी रुग्णालयास अतिरिक्त पाणी हवे असल्याचे नमूद केले. यावर मनपा प्रशासनाने यासाठी हवा असलेला निधी येणे बाकी असल्याचे स्पष्ट केले. हा निधी आरोग्य विभागाकडून महापालिकेला दिला जाईल, असे चव्हाण यांनी म्हटले.
घाटीला हवे २० कोटीघाटी रुग्णालयात अनेक यंत्रसामग्री बंद आहे. ड्रेनेजलाईन जुनी झाली आहे. रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. सुरक्षा भिंत तुटलेली आहे. ६० वर्षे जुनी इमारत आहे. या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी घाटी रुग्णालयास २० कोटींचा निधी हवा असल्याची मागणी बैठकीत करण्यात आली. दंत रुग्णालयास फ र्निचरची गरज असल्याचे सांगण्यात आले.