औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रविवारी जालना रेल्वेस्टेशनची आणि येथे सुरु असलेल्या पीटलाइनच्या कामाची पाहणी करणार आहेत. जालन्याहून थेट नगरसोल येथे रवाना होणार आहे. औरंगाबादची पीटलाइन कागदावरच असून, रेल्वेस्टेशनवरील अनेक प्रकल्प रेंगाळलेले आहेत. तरीही औरंगाबादला बायपास करून रेल्वेचे ‘जीएम’ दौरा आटोपणार आहेत.
जालन्यात पीटलाइनचे काम सुरु झालेले आहे. दुसरीकडे औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पीटलाइनची जागा निश्चित झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात काम सुरु होण्यासाठी कोणत्याही हालचाली होत नाही. रेल्वे सुविधांच्या बाबतीत जालना औरंगाबाद रेल्वेस्टेशनला मागे टाकत आहे. गेल्या अनेक वर्षापासून औरंगाबादेत पीटलाइनची प्रतीक्षा केली जात आहे. परंतु २ जानेवारीला जालना येथे १०० कोटी रुपयांच्या निधीतून पीटलाइन करण्याची घोषणा झाली. त्यानंतर मे महिन्यात औरंगाबादेत १६ बोगीच्या पीटलइनसाठी २९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. परंतु त्यापुढे प्रत्यक्षात पीटलाइन उभारणीला गती मिळत नसल्याची परिस्थिती आहे. या सगळ्यात रविवारी ‘दमरे’चे जीएम अरुणकुमार हे जालन्यात पीटलाइनच्या कामाची पाहणी करणार आहेत. या पाहणीनंतर ते थेट नगरसोलला रवाना होणार आहेत. नगरसोल येथे अतिरिक्त लूपलाईनच्या कामाची पाहणी करणार आहे.
तयारी कशाला?
रेल्वेस्टेशनवर गेल्या काही दिवसांपासून स्वच्छतेपासून रंगरंगोटीचे काम केले जात आहे. मात्र, जीएम औरंगाबादला थांबणारच नसेल तर या सगळ्यावर कशासाठी खर्च केला जात आहे, असा प्रश्न रेल्वे संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.