औरंगाबाद : शहरातील व्हीआयपी ठिकाणची चंदनाचे खोड सुरक्षारक्षकांना चाकूचा धाक दाखवून कापून न्यायचे. हे खोड कुख्यात माहोली आडगावातील चंदन व्यापाराला विकायचे. हा व्यापारी तेच चंदनाचे खोड मध्यप्रदेशातील मंडला जिल्ह्यातील शेंदवाच्या व्यापाऱ्यापर्यंत पोहचवत होते. या चंदनचोराच्या टोळीतील दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. पकडलेल्या दोघांनी आठ ठिकाणी चंदनचोरी केल्याची कबुली दिल्याचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले.
चंदन विकत घेणारा टोळीचा मोहरक्या इलीयास खान रईस खान (रा. माहोली आडगाव) हा थोडक्यात निसटला. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांच्या पथकास चंदनचोरीसाठी कुख्यात माहोली आडगाव येथील दोन चोरटे चंदन विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने पळशी फाटा परिसरात सापळा लावला.
तेव्हा पळशीकडून पिसादेवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नसीबखान मुनीरखान (२२, रा.माहोली आडगाव) व अस्लम खान भुरेखा (२५, रा. सदर) या दोघांना जागीच पकडले. या दोघांची चौकशी केल्यानंतर त्यांनी मुजीब खान महेबुब खान, रईस खान गौस खान (दोघे, रा. सदर), अनीस, हैदर (दोघे रा. कुंजखेडा, ता. कन्नड), आसीफ (रा. घंटाबंरी, ता. सिल्लोड), मशीद (रा. जंजाळा, ता. सिल्लोड) आणि उजेर (रा. माहोली आडगाव) यांच्या मदतीने शहरातील वेदांतनगर ठाण्याच्या हद्दीत तीन, एमआयडीसी सिडको दोन, छावणी, मुकुंदवाडी आणि पुंडलिकनगर ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक ठिकाणचे चंदन चोरुन नेल्याची कबुली दिली.
या आरोपींकडून चंदनाच्या लाकडांसह ३८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कामगिरी निरीक्षक आघाव यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार सतीश जाधव, हवालदार जितेंद्र ठाकुर, संजय राजपुत, विठ्ठल सुरे, नवनाथ खांडेकर, तातेराव शिनगारे, नितीन देशमुख यांच्या पथकाने केली.