औरंगाबाद : गतवर्षी खराब हवामानामुळे जगातील सर्वोच्च शिखर गाठण्यापासून अवघ्या १७0 मीटरने वंचित राहिली तरी औरंगाबादची जिगरबाज महिला गिर्यारोहक मनीषा हिने कच खाल्ली नाही. आता ती नव्या जोमाने तयारीला लागली असून, यंदा पुन्हा नव्या उमेदीने ती जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट फत्ते करण्यासाठी १ एप्रिलला रवाना होणार आहे. तथापि, त्यासाठी आवश्यक असणाºया आर्थिक संकटावर मात करण्याचे तिच्यासमोर आव्हान असणार आहे.गतवर्षी एप्रिल महिन्यातच मनीषा वाघमारे हिने जवळपास एव्हरेस्ट मोहीम फत्तेच केली होती; परंतु हवामानाच्या रौद्ररूपामुळे तिला तिचे लक्ष्य गाठता आले नव्हते. या मोहिमेदरम्यान सोबतच असलेल्या आॅक्सिजन सिलिंडरच्या साथीने तिने आपल्या संघातील एकाचा प्राण वाचवण्यात योगदान दिले आहे. १ एप्रिलपासून ती पुन्हा एव्हरेस्ट मोहिमेसाठी रवाना होणार असून, यंदा आॅक्सिजन सिलिंडरचा दुप्पट साठा घेऊन ती या मोहिमेसाठी जाणारआहे.विशेष म्हणजे ‘डेथ झोन’ म्हणून परिचित असलेल्या कॅम्प फोरपुढील भागात १२ तास थांबणे मोठेच आव्हान असते. या ठिकाणी मनीषाने प्रतिकूल हवामान आणि उणे ७५ अंश तापमानात ४८ तासांचा काळ काढला होता.यावर्षी चढाईसाठी पोषक हवामान असतानाच सुरुवातीलाच शिखरमाथा सर करण्यासाठी पुढे जाणार आहोत, असे मनीषा वाघमारे हिने पत्रकार परिषदेत सांगितले.यंदाच्या मोहिमेसाठी प्रशिक्षक शशी सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली गतवर्षी १ जुलैपासूनच सरावाला प्रारंभ केला आहे. यात व्यायामासह हृदय आणि फुप्फुसाशी संबंधित व्यायामाचा समावेश आहे, असे मनीषाने सांगितले. याप्रसंगी इंडियन कॅडेट फोर्सचे कमांडर विनोद नरवडे यांनीही मनीषाला शहरातील उद्योजक, कंपन्या आणि विद्यापीठाकडून मदत मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या वसुधा पुरोहित यांनीदेखील मनीषाला आर्थिक मदत व्हावी यासाठी महाविद्यालयातर्फे प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेस मनीषा वाघमारे व विनोद नरवडे यांच्यासह जगदीश खैरनार, प्राचार्या वसुधा पुरोहित, राहुल दुधमांडे, प्रशिक्षक शशी सिंग, गौतम पातारे, नंदू पटेल आदींची उपस्थिती होती.
औरंगाबादची जिगरबाज गिर्यारोहक मनीषा एव्हरेस्ट मोहीमेसाठी पुन्हा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 12:20 AM