औरंगाबाद : महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात जन्म घेतलेल्या करिश्मा, शक्ती या वाघांची जोडी आज मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात पाठविण्यात आली. या वाघांची मागील काही वर्षांपासून देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. या वाघांच्या मोबदल्यात औरंगाबादला चितळ, पाणपक्ष्याची जोडी देण्यात आली आहे.
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात वाघ ठेवण्याची क्षमता ठरवून दिली आहे. त्यानुसार प्राणिसंग्रहालयात ९ वाघ ठेवण्यास मान्यता आहे. एप्रिल महिन्यात समृद्धी वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला. त्यामुळे वाघांची संख्या १२ वर पोहोचली आहे. तत्पूर्वी मुंबई महापालिकेने दोन वाघ मिळावेत, अशी मागणी औरंगाबाद महापालिकेकडे केली होती. सोलापूर महापालिकेनेही वाघांची मागणी केली होती. वाघाची जोडी मुंबईला देण्यात यावी, असा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. करिश्मा-शक्ती ही वाघाची जोडी घेऊन जाण्यासाठी मंगळवारी मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयाचे अधिकारी-कर्मचारी दाखल झाले.
प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे, मुंबई मनपाचे पशुधन विकास अधिकारी डॉ. देवकुमार सिरसाट यांनी कागदपत्रांची पूर्तता केली. त्यानंतर वाघाच्या जोडीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. महापौर नंदकुमार घोडेले, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, स्थायी समितीच्या सभापती जयश्री कुलकर्णी, सभागृह नेता विकास जैन यांच्या उपस्थितीत वाघाच्या जोडीला मुंबईकडे रवाना करण्यात आले.
कर्मचाऱ्यांना लागला होता लळाकरिश्माचा जन्म २२ जून २०१४ मध्ये, तर शक्तीचा जन्म १२ नोव्हेंबर २०१६ रोजी झाला होता. दोघांची देखभाल करणारे कर्मचारी चंद्रकांत काळे, मोहंमद झिया यांना त्यांचा चांगलाच लळा लागला होता. या जोडीला रवाना करताना या दोन्ही कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. दोघांच्या डोळ्यातील अश्रू पाहताच पशुधन पर्यवेक्षक संजय नंदन, सोमनाथ मोटे, महंमद जफर, प्रवीण बत्तीसे, सुरेश साळवे या कर्मचाऱ्यांनाही क्षणभर गहिवरून आले. काळे यांनी तर वाघाच्या पिंजऱ्याला हात जोडून क्षमा मागितली. आमच्याकडून सेवा करण्यात चूक झाली असेल तर माफ कर.
दोन चितळांची जोडी, पाणपक्षी मिळालेमुंबई येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयातील दोन चितळांची जोडी आणि पाणपक्षी एक नर दोन मादी सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयास देण्यात आले. हे प्राणी स्वीकारण्यात येऊन वाघाची जोडी देण्यात आली.