छत्रपती संभाजीनगर : देशात बुद्धिप्रामाण्यवाद आणि नैतिकतेला लाथा मारून समाजाला दूषित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’चे लेखक असत्याची चळवळ वाढवत आहेत, याबद्दलची चिंता माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, या परिस्थितीत डॉ. इंद्रजित आल्टे यांनी अभ्यासपूर्वक साधार लेखन करुन अनुसूचित जाती आणि जमातीची सद्यस्थिती समोर आणली आहे. या पुस्तकाचा आशय पाहता सजग नागरिकांना लोकशाही टिकविण्याचे आव्हान लक्षात येईल. डॉ. आल्टे लिखित ‘अनुसूचित जाती-जमाती आणि आर्थिक-सामाजिक न्याय भ्रम आणि वास्तव’ पुस्तकावरील परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
पीईएस इंजिनअरिंग कॉलेजच्या सम्राट अशोक सभागृहात झालेल्या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार दयानंद माने, डॉ. इंद्रजित आल्टे, श्रीमती आल्टे, मंगल खिंवसरा, जे. एल. म्हस्के आणि भंते शांतिदूत यांची प्रमुख उपस्थिती होती. २०११ च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या २० कोटी १३ लाख आणि जमातीची १२ कोटी सहा लाख आहे. ही भारतातील २५ टक्के जनता आहे. दलितांचा खूप विकास झाला असून, त्यांना आरक्षणाची गरज नसल्याचा भ्रम पसरवला जात आहे. देशात अनुसूचित जातीच्या विकासासाठी अर्थसंकल्पात ३.२७ आणि अनुसूचित जमातीच्या विकासासाठी २.४७ टक्के तरतूद असते. सरकार कमी निधी देत असल्यामुळे विकास खुंटला आहे. विकासाची दरी पाहिल्यास वास्तव कळते, असे डॉ. आल्टे म्हणाले. डॉ. एस. एल. मेढे आणि प्रा. भारत सिरसाट यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. पुष्कर आल्टे यांनी संचालन केले.