लाडसावंगी : बोगस बियाणांमुळे पिंपळखुंटा येथील एका शेतकऱ्याचे दोन एकरवरील सूर्यफुलाचे उभे पीक फुले लागताच परिपक्व होण्याअगोदरच तुटून जात आहेत. याबाबत शेतकऱ्याने जिल्हा कृषी विभाग व पं.स. कृषी विभागाकडे तक्रार दिली आहे; मात्र अद्यापही कृषी विभागाचे अधिकारी तिकडे पाहणीसाठी फिरकले नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.
पिंपळखुटा येथील विठ्ठल नामदेव दाभाडे यांनी जालना येथून एका कंपनीच्या सहा बॅग सूर्यफूल बियाणे विकत आणून सहा एकरमध्ये लागवड केलेली आहे. यातील अगोद लागवड केलेल्या दोन एकरमधील सूर्यफुलाला फुले लागताच सूर्यफुलाचे झाडे तुटून जात आहेत. इतर चार एकरमध्ये अद्याप फुले लागली नसल्याने त्या पिकाचीही परिस्थिती अशीच होणार आहे. यामुळे या शेतकऱ्याचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. सदर कंपनीचे प्रतिनिधींनी याकडे कानाडोळा केल्यामुळे दाभाडे यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. यानुसार कृषी विभागाचे पथक तेथे दाखल होऊन पाहणी करणे अपेक्षित होते; मात्र अजूनही हे पथक आले नसल्याने शेतकऱ्याने चिंता व्यक्त केली आहे.
कोट
खूप मेहनत घेऊन मी सहा एकरमध्ये सूर्यफुलाची लागवड केली आहे; मात्र सदर कंपनीचे बियाणे बोगस निघाल्याने फुले लागताच झाडे मोडून जात आहेत. सर्व पीक हातचे गेले असून, याबाबत तक्रार दाखल करून आठवडा झाला; मात्र पिकाची पाहणी करण्यासाठी कोणीही आले नाही. यापूर्वीही मी अनेकवेळा सूर्यफुलाचे पीक घेतले; पण अशी परिस्थिती प्रथमच बघत आहे. सदर कंपनीवर कारवाई करून मला नुकसानभरपाई मिळवून द्यावी.
-विठ्ठल नामदेव दाभाडे, शेतकरी, पिंपळखुटा.
कोट
संबंधित शेतकऱ्याची तक्रार मिळाली असून, पीक नुकसान पाहणी करण्यासाठी कृषी शास्त्रज्ञाला सोबत घेऊन पंचनामा करावा लागतो. दोन दिवसांत संबंधित शास्त्रज्ञाला सोबत घेऊन पाहणी करू, तसेच पिकाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवू. अहवालानंतर संबंधित कंपनीवर कारवाई केली जाईल.
-सुदर्शन मामेडवार, कृषी अधिकारी, पं. स. औरंगाबाद.
फोटो : पिंपळखुटा येथील सूर्यफूल पिकाचे झालेले नुकसान.
220221\jitendra laxman dere_img-20210221-wa0010_1.jpg
पिंपळखुंटा येथील शेतकऱ्याच्या सूर्यपुल पिकाचे झालेले नुकसान.