लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जागाच शिल्लक न राहिल्यामुळे शहरातील ३१ मंगल कार्यालये पहिल्या टप्प्यात ताब्यात घेण्याचा निर्णय झाला आहे. प्रशासनाकडून या संदर्भात घोषणाही झाली. मात्र, पंधरा दिवसांमध्ये अधिकाऱ्यांनी एकही मंगल कार्यालय ताब्यात घेतले नाही. उलट मंगल कार्यालयांमध्ये सोयीसुविधा नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे अधिकारी कोणाच्या दबावाला बळी पडत आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
शहरात दररोज एक हजार कोरोना रुग्णांची भर पडत आहे. ज्या रुग्णांची आर्थिक स्थिती चांगली आहे ते खासगी रुग्णालयात जात आहेत. सर्वसामान्य, मध्यमवर्गीय नागरिक महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणे पसंत करत आहेत. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, सध्या अस्तित्वात असलेली कोविड केअर सेंटर्स व दवाखान्यांमधील खाटांची संख्या कमी पडू लागली आहे. त्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. खाटांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने मंगल कार्यालये ताब्यात घेण्याचा निर्णय पालिकेने जाहीर केला. त्यासाठी ६० मंगल कार्यालयांची यादी तयार करण्यात आली, त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३१ मंगल कार्यालये ताब्यात घेण्याचे आदेशही झोन अधिकाऱ्यांना देण्यात आले. हे आदेश देऊन दहा ते पंधरा दिवस झाले पण अद्याप एकही मंगल कार्यालय पालिकेने ताब्यात घेतलेले नाही. मंगल कार्यालयांमध्ये कोविड केअर सेंटर सुरु करण्यास काही घटकांचा विरोध आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून मंगल कार्यालये ताब्यात घेण्यास विलंब केला जात आहे.
कोविड केअर सेंटर व खासगी तसेच शासकीय रुग्णालयात खाटांची कमतरता असताना पालिका मंगल कार्यालये ताब्यात घेण्याची कार्यवाही युद्धपातळीवर का करत नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.
चौकट..
तेथे सोयी-सुविधा नाहीत
कोविड केअर सेंटरच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा मंगल कार्यालयांमध्ये उपलब्ध कराव्या लागणार आहेत. त्यासाठी टेंडर प्रक्रिया पालिकेने सुरु केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मंगल कार्यालये ताब्यात घेऊन तेथे कोविड केअर सेंटर सुरु केली जातील, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.