वाळूज महानगर : पतीच्या शोधात घराबाहेर पडलेल्या एका परप्रांतिय तरुणीला सुरक्षितपणे पोलिसांच्या स्वाधीन करणाऱ्या रांजणगावातील रिक्षाचालकाचा बुधवारी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात सत्कार करण्यात आला.
उत्तरप्रदेशातील तरुणाने उन्नाव येथील एका अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढुन तिच्याशी लग्न करुन तिला वाळूज एमआयडीसी येथे आणले. उद्योगनगरीत भाड्याचे घर घेऊन हे नवदाम्पत्य राहत असताना आठवडाभरापुर्वी तिचा नवरा घरातुन गायब झाला. त्यामुळे भेदरलेल्या त्या तरुणीने एमआयडीसी परिसरात त्याचा शोध घेतला. मात्र तो कुठेही न सापडल्याने आणि गावी जाण्यासाठी पैसेही नसल्यामुळे ती तरुणी अडचणीत सापडली.
दि. २९ रोजी नवऱ्याच्या शोधात फिरत असताना वाळूजच्या रिक्षा स्टॅन्डवर अॅपेरिक्षाचालक अशोक पानखेडे (रा. रांजणगाव शे.पु.) यांची भेट घेऊन तरूणीने त्यांना रेल्वे स्टेशनपर्यंत सोडण्याची विनंती केली. तरूणीची हतबलता पाहून रिक्षाचालक अशोक याने तिला पंढरपूर येथे वाहतुक शाखेचे निरीक्षक शेषराव उदार व उपनिरीक्षक ताहेर पटेल यांच्याकडे आणून सोडले. तरूणीने त्यांच्याकडे मुळगावी परतण्याची इच्छा व्यक्त केली. प्रसंगावधान राखत पोलिस निरीक्षक उदार व उपनिरीक्षक पटेल यांनी दामिनी पथकाशी संपर्क साधुन या प्रकाराची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी त्या परप्रांतीय तरुणीच्या पालकांचा उत्तरप्रदेशातील ठावठिकाणी शोधुन तिला दामिनी पथकाच्या स्वाधीन केले. यानंतर दामिनी पथकाने तिला सुधारगृहात ठेवुन नुकतेच तिच्या नातवाईकांच्या स्वाधीन केले.
असहाय परप्रांतीय तरुणीला मदत करणारे रिक्षाचालक अशोक बबनराव पानखेडे यांचा बुधवारी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, वाहतुक शाखेचे निरीक्षक शेषराव उदार, उपनिरीक्षक ताहेर पटेल आदींनी रिक्षाचालकाचे कौतूक केले.