औरंगाबाद : लग्न करून मुलांचा सांभाळ करण्याचे आमिष दाखवून तीन वर्षे महिलेवर अत्याचार करणाऱ्या रिक्षाचालकाविरुद्ध बुधवारी पुंडलिकनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. अक्रम बाबू सय्यद (वय ३८ वर्षे, रा. किराडपुरा) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी बांधकाम मिस्त्री आणि रिक्षाचालक असे दुहेरी व्यवसाय करतो. पीडिता गारखेडा परिसरातील रहिवासी असून, तिचे पतीसोबत पटत नसल्यामुळे पाच वर्षांपासून ती पतीपासून वेगळी राहते. २०१७ साली तिच्या प्लॉटवर बांधकाम करण्यासाठी आरोपी आला होता. तेव्हा त्यांच्यात ओळख आणि ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. तेव्हापासून त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून आणि आयुष्यभर तिला आणि तिच्या मुलांचा सांभाळ करण्याचे वचन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
तिने जेव्हा केव्हा लग्नाचा विषय काढला की, तो वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेत होता. काही दिवसांपासून तो तिला सोडून त्याच्या घरी राहात होता. तिचे फोन स्वीकारत नव्हता. ही बाब पीडितेला खटकल्याने तिने त्याला सुनावले असता त्याने लग्नाला नकार देत जातिवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे संतप्त पीडितेने अत्याचारी आरोपीविरुद्ध विश्वासघात करून लैंगिक शोषण केल्याची तक्रार २७ जानेवारी रोजी रात्री पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
स्वयंपाक खोलीत केली लघुशंकाआरोपीने १६ जानेवारी रोजी पीडितेच्या घरी जाऊन तिला जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केली आणि धमकावले. एवढेच नव्हे तर त्याने तिच्यासमोर स्वयंपाक खोलीत लघुशंका केली. या घटनेविषयी तक्रार प्राप्त होताच सहाय्यक आयुक्त किशोर नवले, सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि महिला फौजदार चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली.