औरंगाबाद : मराठवाड्यात आजवर वार्षिक सरासरीच्या तुलनेत निम्माच पाऊस झाला आहे. विभागात ५०.६३ टक्के पाऊस झाला आहे. विभागाला आणखी ५० टक्के पावसाची अपेक्षा आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५९.१४ टक्के, जालना ५०.९९, परभणी ५०.४६, हिंगोली ५२.२८, नांदेड ६२.६९, बीड ३६.१०, लातूर ४७.५८, तर उस्मानाबाद जिल्ह्यात ४१.९३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसांत परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत बरा पाऊस झाला. या पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. मागील २४ तासांत विभागात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. ९ आॅगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत केलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगातून खूप काही विभागाच्या हाती लागलेले नाही.
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, परभणी जिल्ह्यातील झरी, चाटोरी, राणीसावरगाव, चिकलठाणा, जिंतूर, सावंगी म्हा, बोरी, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, हत्ता, नांदेड जिल्ह्यातील लोहा, म्हाळाकोळी, कलंवर, सोनखेड व लातूर जिल्ह्यातील खंडाळी या महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मागील दोन दिवसांत औरंगाबाद जिल्ह्यात १६.८२ मिलिमीटर, जालना १५.२२, परभणी ३७.१७, हिंगोली २४.३९, नांदेड २१.७४, बीड १७.८०, लातूर १४.५६, तर उस्मानाबाद जिल्ह्यात १९.४० मिलिमीटर पाऊस झाला.
बीडमध्ये समाधानकारक पावसाची अपेक्षा बीड जिल्ह्यामध्ये समाधानकारक पावसाची अपेक्षा आहे. आजवर वार्षिक सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात केवळ ३६.१० टक्के पावसाची नोंद झाली आहे. गेवराई, शिरूर कासार, अंबाजोगाई, केज व धारूर या तालुक्यांमध्ये खरीप हंगाम धोक्यात आला आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ७७७ टँकर सध्या सुरू आहेत. त्यातच चाराटंचाई असल्यामुळे छावण्या सुरू आहेत.