टेंभापुरी मध्यम प्रकल्प : स्थानिक व लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक
गंगापूर : टेंभापुरी मध्यम प्रकल्पात सध्या ६५ टक्के पाणी असून शेतकऱ्यांची पाणी सोडण्याची मागणी लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिले. परंतु स्थानिकांच्या दबावाखाली प्रकल्प अधिकारी पाणी सोडण्यास टाळाटाळ करीत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
टेंभापुरी मध्यम प्रकल्पाचा तालुक्यातील २३ गावांमधील ४,७८४ हेक्टर क्षेत्राला फायदा होतो. २१.२७ दशलक्ष घनमीटर पाण्याची क्षमता असलेला हा प्रकल्प दहा वर्षांनंतर यंदा प्रथमच पूर्ण क्षमतेने भरला होता. सध्या प्रकल्पात ६५ टक्के पाणी आहे. उन्हाची तीव्रता वाढली असून पिण्यासाठी व उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडण्याची मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आमदार प्रशांत बंब यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी १० दिवसांचे उन्हाळी आवर्तन सोडण्याचे आदेश ६ मे रोजी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. परंतु स्थानिकांच्या दबावाला बळी पडत हे अधिकारी पाणी सोडण्यास टाळाटाळ करीत आहेत. पोलीस बंदोबस्त असतानाही सोमवार व मंगळवारी सलग दोन दिवस अधिकाऱ्यांना पाणी सोडण्यास स्थानिकांनी विरोध केला. यादरम्यान स्थानिक व लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश व पोलीस बंदोबस्त असूनही पाणी न सुटल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
पाणी सोडण्यास स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन पाणी सोडले गेले नाही. येत्या दोन दिवसात नागरिकांची समजूत काढून योग्य समन्वय साधून १३ मेनंतर कधीही पाणी सोडले जाईल.
- राजेंद्र खापर्डे, प्रकल्प अभियंता
110521\jayesh nirpal_img-20210407-wa0059_1.jpg
टेंभापुरी प्रकल्पाचे संकल्पचित्र