औरंगाबाद : शहरात 31 डिसेंबरच्या ( New Year ) पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने विविध निर्बंध लावण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने संपूर्ण जिल्हाभरात तर औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्यावतीने औरंगाबाद शहरात विविध निर्बंध आणि नियम लागू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ( Omicron Variant ) शहरात नवीन वर्षाचे स्वागत करताना 31 डिसेंबर रोजी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.
ओमायक्रॉनचे नवीन संकट आणि कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले आहे. सध्या शहरात दररोज २ हजार कोरोना टेस्ट होत आहेत. तसेच कोरोना लस आता घरोघरी जाऊन देण्याचे नियोजन महापालिका करत आहे. दरम्यान, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हा तसेच शहर प्रशासनाने विविध निर्बंध लागू केले आहेत.
गर्दी आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच मोक्याच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी 31 डिसेंबरचा उत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांवर अनेक बंधन असणार आहेत. मात्र, रात्री ९ वाजेपर्यंत हॉटेल्समध्ये जेवण करणे किंवा कमी लोकांमध्ये फिरणे यावर बंधने नाहीत.
असे असतील नियम : - कुठल्याही हॉटेलमध्ये पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित उत्सव साजरा करण्यावर की बंधन घालण्यात आले आहे.- रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये 50 टक्के क्षमतेचे बंधन घालण्यात आले आहे- ड्रंक अँड ड्राइव्हवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे.- रात्री उशिरापर्यंत डीजे लावून जल्लोष करणे यावर मर्यादा ठेवण्यात आल्या आहेत.- रस्त्याने फिरताना पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रितरीत्या फिरता येणार नाही - मास्क आणि सॅनिटायझर चा कटाक्षाने वापर करावा लागणार आहे - विना मास्क आढळल्यास प्रशासनाच्या वतीने कारवाई केली जाणार आहे - सार्वजनिक ठिकाणी किंवा कुठल्याही पर्यटन स्थळावर हुल्लडबाजी करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.