कन्नड : शहरातील ग्रामीण रुग्णालयात नागरिकांना कोविडची लस देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असल्याचा प्रकार गुरुवारी समोर आला. ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येणार असल्याने अनेकांना त्यासाठी गर्दी केली होती. मात्र, नागरिकांना कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने ठिय्या आंदोलनानंतर प्रशासन जागे झाले. याप्रकरणी वैद्यकीय अधीक्षकांनी संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
शासनाने गुरुवारपासून (दि.१) ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविडची लस देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे अनेक नागरिकांना कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात सकाळपासून लस घेण्यासाठी गर्दी केली होती. मात्र, रुग्णालयातील कर्मचारी नागरिकांना लस देण्यास टाळाटाळ करत असल्याचे पुढे आले. त्यांच्याकडून विविध कागदपत्रांची मागणी करत त्यांना वारंवार माघारी पाठवत असल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे नागरिकांनी संबंधित प्रकार नगराध्यक्षा स्वाती कोल्हे, नगर परिषदेचे गटनेते संतोष कोल्हे यांच्या कानावर टाकल्यानंतर ते ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. यादरम्यान अनेक नागरिक विनालस घेताच माघारी जात असल्याचे कोल्हे यांना आढळून आले. नागरिकांच्या तक्रारीसंदर्भात त्यांनी कर्मचाऱ्यांना याबाबत विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे कोल्हे यांनी रुग्णालयातील पायऱ्यांवरच ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. याची दखल घेत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता देगावकर यांनी त्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत सर्व नागरिकांना लस देण्यास सुरुवात केल्याने कोल्हे यांनी आंदोलन मागे घेतले. याप्रसंगी नगरसेवक प्रवीण काशीनंद, अनिल गायकवाड, असलम पटेल, अमोल पवार, राजू मोकासे, इसरार मेंबर आदी उपस्थित होते.
--- तिघांना बजावली नाेटीस ---
कन्नड ग्रामीण रुग्णालयात नागरिकांना काेविडची लस देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांना तीन कर्मचाऱ्यांना ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता देगावकर यांनी तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावली. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने शासनाकडे त्यासंबंधीच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. नागरिकांनी लस घ्यावी, यासाठी व्यापक स्वरूपात जनजागृती सुद्धा करण्यात येत आहे. मात्र कन्नडमध्ये लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनाच लस न देताच माघारी पाठविले जात असल्याचा प्रकार पुढे आला होता.
---- कॅप्शन : ग्रामीण रुग्णालयात ठिय्या आंदोलनास बसलेले संतोष कोल्हे व इतर.