लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शिक्षकांच्या बदल्यांच्या धोरणात बदल करीत आॅनलाईन पद्धतीने बदली प्रक्रिया राबविली जात असून, आॅनलाईन अर्ज भरताना जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना रात्र -रात्र जागरण करावे लागत आहे़ शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे दिवाळीच्या सुट्यातही शिक्षक मंडळींची धावपळ झाल्याने संताप व्यक्त होत आहे़ दरम्यान, आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी होत आहे़जि.प. शिक्षकांच्या बदल्या यापूर्वी सर्वंकष पद्धतीने केल्या जात होत्या़ यात बदल करीत आॅनलाईन बदल्या करण्याचे धोरण शासनाने अवलंबिले़ बदल्यांसाठी ज्येष्ठ सेवा, आजारी, विधवा, अपंग, परित्यक्त्या यांचा एक, पती, पत्नी, दुर्गम आदिवासी आणि इतर एकल शिक्षक असे चार संवर्ग तयार करण्यात आले़ चौथ्या संवर्गामध्ये शिक्षकांची संख्या अधिक असतानाही आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी केवळ एक आठवड्याचा कालावधी या शिक्षकांना दिला, तोही ऐन दिवाळी सणाच्या काळातील़ त्यामुळे सणासुदीच्या काळात शिक्षकांना अर्ज भरण्यासाठी जागरण करावे लागले़ यासाठीचा कमी क्षमतेचा सर्व्हर असल्याने एका दिवसात केवळ एकाच शिक्षकाचा अर्ज पूर्ण होत होता़ अनेक वेळा संकेतस्थळावर बदलीच्या ठिकाणांची गावेही दर्शविली नव्हती़ या सर्व प्रक्रियेमुळे शिक्षकांना इंटरनेट कॅफेवर रात्र जागून काढावी लागली़ २४ आॅक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने शिक्षकांना मन:स्ताप सहन करावा लागला़ शासनाने सर्व्हरची क्षमता वाढवावी आणि मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे़ बदल्यांच्या प्रक्रियेला शिक्षकांचा विरोध नाही़ परंतु, अर्धे शैक्षणिक वर्ष संपले असताना आणि ऐन सणाच्या काळात बदलीचा अट्टहास का? असा सवालही या संघटनेने उपस्थित केला आहे़
आॅनलाईन अर्जांसाठी शिक्षकांचे जागरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:25 AM