लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सध्या जग जवळ आलं आहे. यात माणूस मोठा बनला. लोक रस्त्यावर येऊन सरकार, प्रशासनाला जाब विचारताहेत. या लोकजागृतीमुळे लोकशाही परिपक्व होते आहे. राजकारणी कालसापेक्ष आणि स्थलसापेक्ष असतात. समाज झपाट्याने बदलत आहे. त्याचे प्रतिबिंब साहित्यात उमटले पाहिजे, असे मत नागपूर लोकमतचे संपादक व प्रसिद्ध लेखक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.मराठवाडा साहित्य परिषदेचे पुरस्कार वितरण सोमवारी मसापच्या ना. गो. नांदापूरकर सभागृहात झाले. यात यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार प्रा.सुरेश द्वादशीवार यांच्या ‘युगांतर’ ग्रंथास आणि नटवर्य लोटू पाटील नाट्य पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. दिलीप घारे आणि प्रा. यशवंत देशमुख यांना विभागून देण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि प्रत्येकी ११ हजार रुपये रोख देऊन त्यांना सन्मानित केले. यावेळी मंचावर ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर, मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, प्रा.मनोहर जाधव आणि प्रा.जयंत शेवतेकर, डॉ. दादा गोरे उपस्थित होते. यावेळी प्रा. द्वादशीवार म्हणाले, राजकारणातली माणसे चांगली नसतात हे चुकीचे आहे. राजकारणी, साहित्यिक या मानवनिर्मित भिंती आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण, सरदार वल्लभभाई पटेल हे राजकारण्यांपेक्षा अप्रतिम लेखक होते. मधल्या काळातील मुख्यमंत्री आठवत नाहीत, पण लेखकात कोणत्याही प्रकारच्या भिंती नसतात. कुळ, जात, धर्म, देश याबद्दलच्या निष्ठा या जन्मदत्त असतात. त्याविषयी अभिमान बाळगण्याचे कारण नाही. विचारपूर्वक बाळगलेल्या मूल्यांबाबत आपण श्रद्धा बाळगली पाहिजे, असेही द्वादशीवार यांनी सांगितले. यावेळी पुरस्कारप्राप्त रंगकर्मी प्रा. दिलीप घारे आणि प्रा.यशवंत देशमुख यांनीही सत्काराला उत्तर दिले. तत्पूर्वी डॉ. मनोहर जाधव यांनी ‘युगांतर’ ग्रंथावर भाष्य केले. तर डॉ. जयंत शेवतेकर यांनी प्रा. दिलीप घारे आणि प्रा. यशवंत देशमुख यांच्या नाट्यकार्यावर प्रकाश टाकला. प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. दादा गोरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला साहित्यिक, लेखक, कवी, रसिक उपस्थित होते.आता पुतळ्यांची भीती वाटू लागली : कोत्तापल्लेडॉ. नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले, सध्या देशात सर्वत्र अस्वस्थता असल्यामुळे वर्तमान कठीण बनले आहे. आता पुतळ्यांचीही भीती वाटू लागली आहे.तामिळनाडूतील रामस्वामी नायकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे पाडण्यात येत आहेत. यात आणखी महात्मा फुले यांचा समावेश झालेला नाही. नवा भारत घडविण्यासाठीच संविधान आले. यानुसार आपल्याला जावे लागणार आहे. या काळात सुरेश द्वादशीवार, प्रा. दिलीप घारे आणि प्रा. देशमुख यांच्यासारख्यांचे कार्य महत्त्वाचे ठरते, असेही डॉ. कोत्तापल्ले यांनी सांगितले.
जागृतीमुळे लोकशाही परिपक्व- सुरेश द्वादशीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:24 AM
सध्या जग जवळ आलं आहे. यात माणूस मोठा बनला. लोक रस्त्यावर येऊन सरकार, प्रशासनाला जाब विचारताहेत. या लोकजागृतीमुळे लोकशाही परिपक्व होते आहे. राजकारणी कालसापेक्ष आणि स्थलसापेक्ष असतात. समाज झपाट्याने बदलत आहे. त्याचे प्रतिबिंब साहित्यात उमटले पाहिजे, असे मत नागपूर लोकमतचे संपादक व प्रसिद्ध लेखक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देमराठवाडा साहित्य परिषदेचे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान