प्रा.प्रतिभा अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कविसंमेलनात रणहलगीकार संभाजी भगत(मुंबई), चित्रपट गीतकार प्रा.विनायक पवार(मुंबई),लोककवी प्रा.आदिनाथ इंगोले(नांदेड), गझलकार प्रा. मुकुंद राजपंखे(आंबेजोगाई), प्रा. संजय बोरूडे(अहमदनगर) आदींनी सहभाग नोंदवला.
संभाजी भगत यांनी वर्तमान राजकीय विषमता आणि वर्गीय चारित्र्यावर आपल्या पहाडी आवाजात गेय कवितेने हल्ला चढवला...
''बया पहाटच्या गं पारी
कुणी नव्यानं गं गाणं गातो...
धक्का चावडीला देतो गं माझे
मायं...
बया ईकता,ईकता यांनी ईकला
गं देस...
अन् पालटला भेसं,कुठं शोधावी
गं वेसं,माझे माय.....''
प्रतिभा अहिरे यांनी याच दाहक वास्तवावर हल्लाबोल केला.
'' ते करु पाहताहेत देशाला एक यातनाघर...
आम्ही माणसांच्या शोधात तुडवतो मुलुख मैदान
आता या रक्ताळलेल्या शतकातून वाट पुसत कबीराकडेच जायला हवं...''
प्रा. मुकुंद राजपंखे यांनी आपल्या सुरेल आवाजात, महाराष्ट्राच्या मनात घर केलेली गझल सादर केली...
प्रा. विनायक पवार यांनी मानवमुक्तीच्या महामानवांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी गेय कविता सादर करून रसिकांना हेलावून सोडले. डॉ. शेखर मगर यांनी प्रास्ताविक केले. राजानंद सुरडकर, मुकुल निकाळजे, संतोष गडकरी, सचिन सुरडकर, डॉ. मारुती तेगमपुरे आदींनी कविसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.