औरंगाबाद : घोषवाक्यांच्या फलकांच्या माध्यमातून पाणी बचतीबाबत जागृती करण्याचा स्तुत्य उपक्रम न्यू नंदनवन कॉलनीतील हर्षा बनसोडे आणि लोकेश बनसोडे हे बहीण- भाऊ राबवीत आहेत.सध्या शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या आहेत. सुट्या म्हणजे बच्चेकंपनीसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. उन्हाळ्याच्या सुटीत काय करायचे, याचे नियोजन त्यांनी आधीच करून ठेवलेले असते. सुट्यांमध्ये अनेक जण मामाच्या गावी जातात. काही जण आई-वडिलांसोबत पर्यटनस्थळांना भेटी देतात. हर्षा आणि लोकेश हे त्यास अपवाद ठरले आहेत. जि.प.चे कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी पी.एस. बनसोडे यांचे पाल्य असणारे हर्षा आणि लोकेश हे ज्ञानसंपदा प्राथमिक शाळेत अनुक्रमे इयत्ता आठवी आणि सहावीत शिक्षण घेत आहेत. निवडणुकांच्या वेळी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी त्यांनी यापूर्वी जागृती केली आहे. स्वच्छता मोहिमेतही त्यांचा सहभाग राहिलेला आहे. समाजसेवेचे बाळकडू मिळालेली ही बहीण- भावाची जोडी आता पाणी बचतीसाठी जनजागृती करीत आहे. न्यू नंदनवन कॉलनी येथील महात्मा फुले स्मृती स्तंभाजवळ सकाळ आणि सायंकाळच्या वेळी हातात घोषवाक्यांचे फलक घेतलेले हर्षा आणि लोकेश हे नागरिकांचे लक्ष वेधून घेतात. ‘नैसर्गिक जलस्रोतांचे बळकटीकरण करा, आपले जीवन सुखकारक करा’, ‘पाणी हेच जीवन आहे, पाण्याचा अपव्यय टाळा’, असा मजकूर लिहिलेल्या फलकांच्या माध्यमातून ते पाणी बचतीबाबत जनजागृती करीत आहेत. घरातही काटकसरीने वापरपाणी बचतीचे महत्त्व पटवून देणारी ही बालके स्वत:च्या घरातील पाण्याचाही अत्यंत काटकसरीने वापर करीत असतात. खेळ, दंगामस्ती करण्याच्या वयात या बालकांनी इतरांसमोर आदर्श घालून दिला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.पाण्याचा काटकसरीने वापर करून त्याची बचत करणे सध्याच्या परिस्थितीत नितांत गरज आहे. पाणी बचतीबाबत जनजागृती करण्यासाठी ‘लोकमत’ने ‘जलमित्र अभियान’ सुरू केले आहे. पाणी बचतीसाठी तुम्ही नवनवीन कल्पना राबवीत असाल, तर आपले अनुभव आम्हाला ९८८१३००४९४, ९८८११९७३९८ या क्रमांकावर कळवावेत.
घोषवाक्यांच्या माध्यमातून पाणी बचतीसाठी जागृती
By admin | Published: May 22, 2016 12:20 AM