छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर हे २०० कि.मी. अंतरावरील विमानांना हवाई मार्ग दाखविण्याचे काम करीत आहे. तुम्ही म्हणाल हे कसे? हे शक्य होत आहे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अत्याधुनिक प्रणालीमुळे. ही प्रणाली असलेल्या ४८ ॲन्टिनायुक्त अत्याधुनिक अशा ‘डीव्हीओआर’ कक्षाचा गुरुवारी उद्घाटन सोहळा पार पडला.
चिकलठाणा विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानसेवेच्या दृष्टीने जय्यत तयारी सुरू आहे. विमानतळावरील विविध सुविधाही अद्ययावत करण्यात येत आहेत. विमानतळावर २०१२ मध्ये पहिले ‘डीव्हीओआर’ (डॉप्लर व्हेरी हाय फ्रक्वेंसी ओम्नी रेंज) हे लावण्यात आले होते. सदर तंत्रज्ञान हे १२ वर्षांपूर्वीचे असल्याने त्याऐवजी आता धावपट्टीपासून काही अंतरावर नवीन ‘डीव्हीओआर’ची यंत्र कार्यान्वित करण्यात आलेले आहे. विमानतळाचे संचालक शरद येवले यांच्या हस्ते या नव्या यंत्रणेचे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहायक महाव्यवस्थापक (नेव्हीगेशन) नितीन मेश्राम, ‘डीजीएम’ सुरेशकुमार धुर्वे, ‘सीआयएसएफ’चे डेप्युटी कमांडंट पवनकुमार यांच्यासह विमानतळाच्या विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
‘डीव्हीओआर’चा उपयोग कशासाठी ?हे तंत्र आधुनिक असून हवाई क्षेत्रात आलेल्या प्रत्येक विमानाला त्याचा हवाई मार्ग दाखविण्यासाठी हे यंत्र उपयोगी पडते. या यंत्रावर वर्तुळ आकारात सर्व बाजूने एकूण ४७ ॲन्टिना लावण्यात आलेले आहे. तर मध्यभागी इतर ॲन्टिनापेक्षा उंच एक ॲन्टिना लावलेला आहे. या ४८ ॲन्टिनांच्या मदतीने विमानतळाच्या चारही बाजूने २०० कि.मी. अंतरातून जाणाऱ्या विमानांना त्यांची दिशा, त्यांची उंची, त्यांचा हवाई मार्ग, पायलटला हवामानाचीही माहिती मिळते. यातून विमानाचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होत असल्याचे विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.