औरंगाबाद : मोटार वाहन कायद्यातील विविध नियमांचे पालन करणे सर्व वाहनचालकांना बंधनकारक आहे. असे असताना जानेवारीपासून कालपर्यंत शहरातील तब्बल ९० हजार नागरिकांनी वाहतूक नियम तोडल्याचे समोर आले आहे. नियमभंग करणाऱ्या या वाहनचालकांकडून १ कोटी १५ लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेकडून मिळाली.शहरात सुमारे ८ लाख दुचाकी, २५ हजार आॅटोरिक्षांसह १२ लाख वाहने आहेत. यासोबतच बाहेरगावाहून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या वेगळी आहे. शहरातील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी शहर, सिडको आणि छावणी, असे तीन विभाग आहेत. सहायक पोलीस आयुक्त, तीन पोलीस निरीक्षक आणि फौजदारांसह सुमारे २६५ कर्मचारी वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. जानेवारीपासून शहरात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू झाली. विविध चौकांत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे वाहतूक नियमभंग करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. आजही शहरातील २० टक्के नागरिक विनाहेल्मेट दुचाकी चालवितात. शिवाय ट्रीपल सीट दुचाकी चालविणे, वाहतूक सिग्नल तोडून पळणे, नो एंट्रीतून वाहने नेणे, वाहन चालविताना सोबत लायसन्स आणि वाहनाची कागदपत्रे जवळ न बाळगणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून रिक्षा चालविणे, वाहतुकीला अडथळा होईल अशा प्रकारे रस्त्यावर वाहन उभे करून वाहतूक नियमांचा भंग केला जातो. वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांविरोधात शहर वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून नियमित कारवाई केली जाते. जानेवारीपासून तर हेल्मेट सक्तीबाबत सतत मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेत वाहतूक शाखेसोबत विविध ठाण्यांतील पोलिसांना रस्त्यावर उतरविण्यात येते. जानेवारीपासून आतापर्यंत ९० हजार नागरिकांनी वाहतूक नियम तोडल्याचे समोर आले. त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करून १ कोटी १५ लाख ३ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचे वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यास प्राधान्य आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनचालकांकडून दंड वसूल करण्याची ही पहिलीच वेळ आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त सी. डी. शेवगण यांनी दिली. हेल्मेटसक्ती लागू झाल्यापासून कालपर्यंत ७९ हजार ११७ नागरिकांवर विनाहेल्मेट दुचाकी चालविल्याप्रकरणी केसेस करण्यात आल्या. त्यांच्याकडून ८४ लाख ८६ हजार ९०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
वाहतूक नियमांची ऐशीतैशी
By admin | Published: May 30, 2016 12:56 AM