लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहर स्मार्ट सिटी म्हणून झेपावणाऱ्या औरंगाबादेत ‘गुन्हेगारी’चे रंग बदलू लागले आहेत. गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढू लागली आहे. शहरात पिस्तूल,कट्टे खुलेआम सापडत असून, याचे कनेक्शन उत्तर भारतात असल्याचा संशय पोलिसांना आहे.पुंडलिकनगर पोलीस ठाणे हद्दीत पिस्तुलासह महिलेला ताब्यात घेतल्यानंतर जयभीमनगर घाटी परिसरात हवेत गोळीबार करून आरोपी फरार झाला, अशा घटना घडल्यामुळे सामान्य औरंगाबादकरांत दहशत निर्माण झाली आहे. या घटनांनी पोलीस यंत्रणेला खुलेआम आव्हान दिले आहे.पोलीस आयुक्तालयापासून असलेल्या जयभीमनगर परिसरात गोळीबार झाला. जिवंत काडतूस सापडले. मात्र, तो गोळीबार करणारा आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.गेल्या आठवड्यात पुंडलिकनगर परिसरात गावठी पिस्तूलरूपी कट्टा कुठून आणला, याची माहिती संबंधित महिलेकडून मिळालेली नाही; परंतु शहरात विना परवाना गावठी कट्टे (पिस्तूल) शहरात किती जणांकडे आहेत. त्याचे रीतसर परवाने आहेत की नाही, याचा शोधदेखील पोलीस घेत आहेत.न्यायनगरातील ज्योती कडुबा अहिरे ऊर्फ सायरा शेख हिच्याकडून दोन जिवंत काडतूस व गावठी पिस्तूल (अग्निशस्त्र) कोठून आले, याचा शोध घेण्यासाठी पोलीस आता हर्सूल कारागृहात असलेल्या तिच्या पतीची चौकशी करणार आहेत. सायरा शेख हिचा पती शेख शहजाद शमीम शेख (रा. आझमगढ, उत्तर प्रदेश) हा शहाबाजार परिसरात खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी असून, तो सध्या हर्सूल कारागृहात आहे.पिस्तुलात दोनच जिवंत काडतूस सापडले. इतर काडतुसांचे काय केले व ते पिस्तूल कशासाठी घेतले होते, याचा शोध पोलीस घेणार आहेत.याशिवाय सोनसाखळी लुटमारीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यापूर्वीच त्याने पिस्तूल सायराकडे का ठेवला आहे. याचा तपास पोलीस करीत आहेत.
पुंडलिकनगरात सापडलेल्या पिस्तुलाचे आझमगढ कनेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 12:48 AM