औरंगाबाद : यंदाचा बी रघुनाथ पुरस्कार बालाजी सुतार यांच्या ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ या कथासंग्रहाला जाहीर झाला आहे. कोरोना आपत्तीमुळे ७ सप्टेंबर रोजी बी रघुनाथ यांच्या स्मृतिदिनी साधेपणाने नाथ समूहाच्या कार्यालयात सुतार यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.नाथ समूह आणि परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमाने गेली एकतीस वर्षे हा उपक्रम सुरू आहे. प्राध्यापक अजित दळवी, प्राध्यापक दासू वैद्य आणि श्रीकांत उमरीकर यांच्या निवड समितीने बालाजी सुतार यांच्या या कथासंग्रहाची पुरस्कारासाठी निवड केली.
कविवर्य फ.मुं. शिंदे, रंगनाथ पठारे, ललिता गादगे, भास्कर चंदनशिव, नागनाथ कोत्तापल्ले, बाबू बिरादार ,निरंजन उजगरे,भारत सासणे, श्रीकांत देशमुख, नारायण कुलकर्णी कवठेकर, प्रकाश देशपांडे केजकर ,बब्रुवान रुद्रकंठावार, राजकुमार तांगडे, रमेश इंगळे उत्रादकर, ल. म. कडू, सुहास बहुळकर, नितीन रिंढे, रेखा बैजल यासारखे प्रथितयश साहित्यिक या पुरस्काराचे आतापर्यंत मानकरी ठरले आहेत. नाथ समूहाचे नंदकिशोर कागलीवाल, सतीश कागलीवाल, संतोष जोशी, शिवा फाळके आणि परिवर्तनचे प्रा. मोहन फुले, डॉ. सुनील देशपांडे, लक्ष्मीकांत धोंड, डॉ.आनंद निकाळजे, राजेंद्र जोशी, नीना निकाळजे आदी या उपक्रमासाठी दरवर्षी प्रयत्नशील असतात.