औरंगाबाद - सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज संस्थांमधील ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्दबातल केलं आहे. त्यामुळे, ओबीसी समाजासह ओबीसी समाजाचे नेतेही आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत ओबीसी समाजाचं आरक्षण पूर्ववत होत नाही, तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, अशी भूमिकाही अनेकांनी घेतली आहे. त्याच अनुषंगाने आज औरंगाबाद येथे ओसीबी समाजाचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला आपत्ती व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार हेही उपस्थित होते. यावेळी, त्यांनी तुफान फटकेबाजी करत बाबा रामदेव यांच्यावरही टीका केली.
ओबीसींच्या हक्काच्या 40 हजार राजकीय जागा आहेत. त्या जागा आम्ही कुणालाही देऊ देणार नाही. ओबीसी राजकीय आरक्षणासाठी सर्व समाजानं एकत्र यावं, असं आवाहन वड्डेटीवार यांनी केलं आहे. तसेच, केंद्र सरकार आणि भाजपावरही त्यांनी टीका केली. केंद्र सरकारकडून इंपेरियल डेटा देण्यात येत नाही, असे म्हणत त्यांनी केंद्रावर टीका केली. तसेच, बाबा रामदेव यांच्या व्यावसायीकतेवरही त्यांनी चांगलाच प्रहार केला.
रामदेव बाबांना टोला
'रामदेव बाबा जेवढ्या गाई नाहीत, त्यापेक्षा अधिक तूप विकत आहेत. तर जेवढ्या मधमाशा नाहीत, त्याहून अधिक मध विकत आहे. पण आपलं तसं नाही, जेवढ्या गाई आहेत, तेवढंच तूप निघतं आणि तेवढंच तूप विकतो' अशा शब्दात रामदेव बाबाला वडेट्टीवार यांनी टोला लगावला आहे.