- सुमेध उघडे
औरंगाबाद : दरवर्षी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देशोदेशी मोठ्या उत्साहात साजरी होते. संपूर्ण एप्रिल महिन्यात बाबासाहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रमांची रेलचेल असते. यात सोशल मीडियासुद्धा मागे नसून, एप्रिल महिना सुरू झाल्यापासूनच बाबासाहेबांवर आधारित विविध ‘टॉपिक’ यावर ‘ट्रेंडिंग’ आहेत.
फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टाग्राम या सर्वांत जास्त वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडियावर सध्या भीमजयंती ‘ट्रेंडिंग’ आहे. यातील ट्रेंड मुख्यत: बाबासाहेबांच्या विचारांना अनुसरून आहेत. यासोबतच त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करणारे ट्रेंड टॉपिक सर्वांत जास्त वापरात आहेत. यातील #ThanksAmbedkar हा टॅग सर्वांत जास्त चर्चित आहे. बाबासाहेबांमुळे जीवनात झालेला बदल, त्यांच्या विचारांचे अनुकरण केल्याने मिळवलेले यश, मान, सन्मान याबद्दल अनेक जण व्यक्त होत आहेत. यासोबतच ‘#भीमजयंती२०१८’ या टॅगखाली यावर्षीच्या जयंतीमधील उपक्रमांच्या पोस्ट चर्चेत आहेत.
बाबासाहेबांच्या ‘सही’ची थीम
आपल्या प्रोफाईल इमेजवर बाबासाहेबांच्या सहीची थीम लावणे हा ट्रेंड सध्या फेसबुकवर खूप गाजत आहे. बाबासाहेबांची सही व त्याखाली ‘असंख्य जणांचे आयुष्य बदलणारी सही’ असे लिहिलेली ही थीम आहे. विविध क्षेत्रांत नामवंत असणाऱ्या व्यक्ती याचा वापर करीत आपल्या आयुष्यात बाबासाहेबांचे महत्त्व यावर लिहित्या झाल्या. यात सर्वांत जास्त लाईक आणि शेअर झालेल्यांपैकी मुंबई विद्यापीठातील निखिल बोर्डे हा लिहितो, ‘मालमत्तेवर ज्याचा मालकीहक्क असतो त्याचीच सही कागदपत्रांवर असते. मग आमच्यावर, आमच्या वैभवावर, आमच्या संपत्तीवर तर सोड, जगण्यावरच तुझा मालकीहक्क आहे! म्हणून आमची जिंदगी बदलणारी तुझी ही सही..!’, कवी कुणाल गायकवाड लिहतो, ‘ही सणक डोक्यात, ही बेदार नजर डोळ्यात, ही भाषा, सारं काही तुझ्यामुळे.’, औरंगाबादचा अभियांत्रिकीचा विद्यार्थी मुकुल निकाळजे लिहितो, ‘बा भीमा... तूच स्वाभिमानी जीवनाचा शिल्पकार, तूच माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणारा!!!’ तर पुणे येथील अॅड. प्रणाली काळे लिहितात, ‘माझे सोनेच केले रे... एका मोठ्या सराफाने... आज मुजरे मला करती... त्या भीमाच्या प्रतापाने!’ यासोबतच असंख्य जणांनी, ‘बाबासाहेब तुम्ही केवळ घटनेचे शिल्पकार नसून, आमच्या जीवनाचेही शिल्पकार आहात’ अशा शब्दांत आपल्या भावना या थीमद्वारे शेअर केल्या आहेत.
पाच भीमगीतांचा ट्रेंड
या ‘टॉपिक’मध्ये गाजलेली अथवा स्वत: लिहिलेली पाच भीमगीते शेअर करून आपल्या पाच मित्रांना अशी गीते शेअर करण्यासाठी आमंत्रित केले जाते. यातून वामनदादा कर्डक, शाहीर विजयानंद जाधव, सुरेश भट, प्रतापसिंग बोदडे, नागसेन सावदेकर, मनोज राजागोसावी, प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, सुषमा देवी आदी प्रसिद्ध शाहिरांची जुनी नवी गीते ‘ट्रेंडिंग’ ठरत आहेत.