लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध ग्रंथ व भाषणांमधून मांडलेले विचार लोकभाषेत मांडण्याची गरज आहे. खरंतर बाबासाहेब यांचे अनमोल विचार, जीवनकार्य विचारवंतापेक्षाही वामनदादा कर्डक, अण्णाभाऊ साठे यांच्यासह अनेक लोककलावंतांनी गावोगावी आणि घराघरात पोहोचवले, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मुख्य प्रशासकीय इमारतीत लावण्यात आलेले व विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता तथा ज्येष्ठ चित्रकार प्रा. दिलीप बडे यांनी रेखाटलेले डॉ. आंबेडकर यांचे तैलचित्र तसेच ‘गीत भीमायन’ या वामनदादा कर्डक यांनी रचलेल्या गीतांच्या ध्वनिफितीचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. संजय मोहड यांनी गीतांना संगीत दिले आहे. ध्वनिफितीचे विमोचन बुधवारी ऊर्जामंत्री राऊत यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. यावेळी अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले होते. या कार्यक्रमाला प्रकुलगुरु डॉ. शाम शिरसाठ, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राहुल मस्के, राजेश करपे मंचावर उपस्थित होते. चित्रकार प्रा. दिलीप बडे, अधिष्ठाता डॉ. वाल्मिक सरवदे, कार्यकारी अभियंता रवींद्र काळे, संगीत विभागप्रमुख डॉ. जयंत शेवतेकर, डॉ. मुस्तजिब खान आदीही यावेळी उपस्थित होते.
राऊत म्हणाले, डॉ. आंबडेकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नागसेन वन व विद्यापीठ परिसर ही क्रांतीकारी भूमी आहे. या भूमीने देशाला नामांकित विचारवंत, कलावंत दिले. त्यामुळे आज बाबासाहेबांच्याच नावाने चालणाऱ्या या विद्यापीठाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले, याचा मनस्वी आनंद आहे. डॉ. आंबेडकर यांनी वंचितांचा उद्धार व आदर्श राज्यघटना लिहून जगाला लोकशाहीचे महत्त्व पटवून दिले. आजच्या बदललेल्या परिस्थितीत व धार्मिक उन्मादाच्या कालखंडात बाबासाहेबांचेच विचार हे परिवर्तनाचे शस्त्र घेऊन लढावे लागेल.
विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा प्रकुलगुरू डॉ. शाम सिरसाट यांनी प्रास्ताविकातून घेतला. या कार्यक्रमात कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. चेतना सोनकांबळे, अधिसभा सदस्य डॉ. जितेंद्र देहाडे, अरुण सिरसाट आदींसह अनेकांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला. विद्यार्थी विकास संचालक डॉ. मुस्तजिब खान यांनी सूत्रसंचालन केले.
अध्यक्षीय समारोपात कुलगुरु डॉ. प्रमोद येवले म्हणाले, स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय या चतु:सुत्रीचा अवलंब संपूर्ण जीवनभर करणारे डॉ. आंबेडकर हे खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे निर्माते आहेत. डॉ. आंबेडकर यांचे नाव असलेल्या विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा हा क्षण आहे.
फोटो कॅप्शन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. ऑनलाईन पद्धतीने ऊर्जामंत्री नितीन राऊत या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, प्रकुलगुरु डॉ. शाम शिरसाठ, डॉ. राहुल मस्के, राजेश करपे, प्रा. दिलीप बडे, डॉ. वाल्मिक सरवदे आदी उपस्थित होते.