- विकास राऊत
औरंगाबाद : सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालावरून नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे रविवारी उघडण्यात आले. बंधाऱ्यातील १५़८१ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ०़५६ टीएमसी जलसाठा तेलंगणात सोडण्यात आला. त्यामुळे ऐन पावसाळ्यात हा बंधारा कोरडाठाक झाला. याचा परिणाम जायकवाडी आणि गोदावरीपात्रावर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळा सुरू होऊन २४ दिवसांचा कालावधी संपला आहे. जून महिन्यात मराठवाड्यात समाधानकारक असा पाऊस न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत असतानाच बाभळीतील पाणी तेलंगणात गेले आहे.
बाभळीप्रमाणेच जायकवाडी धरणावरील जलसाठ्यांतून पाणी सोडण्याच्या तारखा निश्चित होण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. १ जुलै रोजी बाभळीत पाणी सोडण्यात आले. त्याचप्रमाणे जायकवाडीतही वर्षनिहाय तारखा निश्चित होणे गरजेचे आहे. समन्यायी पाणी वाटपाचा मुद्दा या निमित्ताने स्पष्टपणे समोर येईल, असे मत जलतज्ज्ञांतून व्यक्त होत आहे. गोदावरी नदीपात्रात जायकवाडीच्या खाली मोठे ११ प्रकल्प आहेत.
सध्या जायकवाडीत २१ टक्के पाणीसाठा आहे. यंदाच्या पावसाळ्यातील जून महिना कोरडाच गेल्यासारखा आहे. पुढील तीन महिन्यांतील पावसाने बाभळी बंधाऱ्यासह गोदावरीपात्रात समाधानकारक पाऊस झाला नाही, आणि जायकवाडी भरले तर खालच्या पट्ट्यात पाणी सोडावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाभळीप्रमाणे जायकवाडीसाठी निर्णय व्हावाबाभळी बंधाऱ्यासाठी ज्याप्रमाणे पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. त्याच धर्तीवरच जायकवाडीसाठी निर्णय व्हावा, अशी प्रतिक्रिया जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी नोंदविली. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदरच आहे; परंतु राज्य शासनाने जायकवाडी धरणात वरील धरणांतून या निर्णयाप्रमाणे पाणी यावे. यासाठी न्यायालयात गेले पाहिजे. जायकवाडीच्या हक्काचे पाणी सोडण्यात यावे, त्या पाण्याचे आम्ही काहीही नियोजन करू; परंतु निर्णय बाभळीप्रमाणे व्हावा, असेही पुरंदरे म्हणाले.