औरंगाबाद : सर्वांची नजर चुकवून एका महिलेने घाटी रुग्णालयातून नवजात शिशूला पळविल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली. जन्मानंतर काही तासांतच पोटचा गोळा नजरेआड झाल्याने आईने हंबरडा फोडला. पण रिक्षाचालक, परिचारिका, मावशींच्या सतर्कतेने दोन तासांतच हे बाळ पुन्हा आईच्या कुशीत विसावले व सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.
नेमके काय घडले?सोनाली हराळे (रा. लिंबे जळगाव, गंगापूर) यांची सोमवारी घाटीत प्रसूती झाली. त्यांनी मुलाला जन्म दिला. मंगळवारी सुटी मिळणार असल्याने त्या आपल्या आईसह वाॅर्डातील खाटेजवळ थांबल्या. बाळाला खाटेवर सोडून मायलेकी कपडे बदलण्यास गेल्या. हीच संधी साधून महिलेने हे बाळ उचलून धूम ठोकली.
हंबरडा अन् शोधाशोध
माय-लेकी खाटेजवळ आल्यावर बाळ न दिसल्याने दोघींनी हंबरडा फोडला. हे लक्षात येताच वाॅर्डातील परिचारिका व मावशींनी सर्वत्र शोध सुरू केला. प्रसूती विभागातील कर्मचाऱ्यांनी रिक्षाचालकांना विचारणा केली, तेव्हा बाळासह असलेल्या एका महिलेला रिक्षाचालक उस्मान खान मेहमूद खान हे घेऊन गेल्याचे कळले.
प्रसंगावधान आले कामी
उस्मान खान यांना फोन करून माहिती दिली. तेव्हा उस्मान खान हे त्या महिलेला जुना मोंढा- जाफरगेट परिसरातील पेट्रोल पंपाजवळील गल्लीजवळ सोडून परत येत होते. ती महिला कुठे जाते, हे त्यांनी पाहिले होते. ते लगेच तिथे पोहोचले. परिचारिका, मावशीही तिथे पोहोचल्या. त्यांनी प्रत्येक घराचे दार वाजवून शोध घेतला. अखेर एका घरात हे बाळ मिळाले.