लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जमिनीचे वाटपणीपत्र तयार करून तसा फेर मंजूर करून देण्यासाठी आठशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या काळेगाव (ता.जाफराबाद) येथील तलाठी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अटकला. सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याचे नाव अतुल सर्जेराव बोर्डे (३९), असे आहे.या प्रकरणातील तक्रारदार दोघे भाऊ असून, त्यांची वानखेडा येथे शेतजमीन आहे. जमिनीची वाटणी करून तसा फेर मंजूर करण्यासाठी संबंधितांनी वानखेडा सजाचे तलाठी अतुल बोर्डे यांच्याकडे १३ जुलैला आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. या कामासाठी तलाठी बोर्डे यांनी एक हजार रुपयांची लाच मागितली. पैकी २०० रुपये लगेच घेतले. २१ जुलैला कामाबाबत विचारण्यास गेलेल्या तक्रारदारास बोर्डे याने उर्वरीत पैसे दिल्याशिवाय काम होणार नाही म्हणून सांगितले. मात्र, तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. लाचलुचत विभागाने वरुड येथील बोर्डे याच्या कामकाजाच्या खोलीत सापळा लावून बोर्डे यास तक्रारदाराकडून ८०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक आजिनाथ काशिद, व्ही. एल. चव्हाण, अशोक टेहरे, संतोष धायडे, अमोल आगलावे, नंदू शेंडिवाले, संजय उदगीरकर, महेंद्र सोनवणे, गंभीर पाटील, रमेश चव्हाण, संदीप लव्हारे, खंदारे, कुदर, म्हस्के यांनी ही कारवाई केली.
वाटणीपत्रासाठी तलाठ्याने घेतली लाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 1:03 AM