औरंगाबाद : जगप्रसिद्ध पाणचक्कीसमोरील ऐतिहासिक मेहमूद दरवाजाला आज दुपारी ट्रकने जोरदार धडक दिली. यामुळे दरवाजाच्या वरचा भाग निखळला आहे. या धडकेने दरवाजाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाली असून पोलिसांनी यातून होणारी वाहतूक बंद केली आहे.
पाणचक्कीच्या दर्शनी भागातच मेहमूद दरवाजा मागील ३५० वर्षांपासून दिमाखात उभा आहे. जगप्रसिद्ध पाणचक्की पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना याच दरवाजातून पुढे जावे लागते. खाम नदीवरील हा बुलंद दरवाजा पर्यटकांसाठीही आकर्षण केंद्र आहे. आज दुपारी यातून जाणाऱ्या एका ट्रकने दरवाजाला जोरदार धडक दिली. यामुळे दरवाजाच्यावरील भाग निखळला आहे. तसेच संपूर्ण दरवाजालाच यामुळे नुकसान पोहचले असून इतर भाग सुद्धा पडण्याची शक्यता आहे. यामुळे पोलिसांनी यातून होणारी वाहतूक बंद केली आहे.
जून महिन्यात सुद्धा या दरवाजाच्या आतील भागात असलेले लाकडी गेट अचानक निखळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. आज दुपारी याची पुनरावृत्ती झाली असून दरवाजा मोठी हानी पोहोंचली आहे. शहरात ५२ दरवाजांपैकी केवळ १४ दरवाजे शिल्लक राहिले आहेत. महापालिका प्रशासन या ऐतिहासिक दरवाजांकडे दुर्लक्ष करीत असल्याने यांची वाताहत होत असल्याचा आरोप इतिहासतज्ज्ञांनी केला.
( ऐतिहासिक मेहमूद व रोशन गेटच्या दुरूस्तीसाठी हवेत सव्वा कोटी )