लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेचा आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार जिल्हाधिकारी नवल किशोर राम सांभाळत असले तरी १५ डिसेंबरनंतर मनपात आयुक्त कोण? असा प्रश्न शहराला पडलेला आहे. त्यातच अचानक रविवारी महापालिकेच्या पिचवर येऊन माजी आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी फलंदाजी केली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. बकोरिया एवढ्यावरच थांबले नाहीत, तर मनपा सभागृहात ज्या पदाधिकारी व नगरसेवकांसोबत त्यांचे वारंवार खटके उडत त्यांच्यासोबत त्यांनी प्रदीर्घ चर्चाही केली.ओम प्रकाश बकोरिया हे नाव ऐकताच आजही अनेक अधिकारी व कर्मचाºयांच्या मनात धडकी भरते. मनपातील काही पदाधिकारी तर बकोरिया यांच्या केबीनसमोरूनही जात नसत. अचानक त्यांचा सामना झाल्यास ते काही तरी बोलतील एवढी भीती काही नगरसेवकांना होती. ओसाड गरवारे क्रीडा संकुलाला नवसंजीवनी देण्याचे कामही त्यांनी केले. रविवारी या क्रीडा संकुलाचा लोकार्पण सोहळा होता. या कार्यक्रमास खास बकोरिया यांनाही निमंत्रण देण्यात आले. महापालिका हा आवडीचा विषय असल्याने त्यांनीही निमंत्रण स्वीकारून महापालिकेच्या पिचवर हजर झाले. यावेळी त्यांनी मनसोक्तपणे नवीन पिचवर फलंदाजी केली. विशेष बाब म्हणजे सभागृहात नेहमी नगरसेवक राजू शिंदे यांच्यासोबत त्यांचे शाब्दिक खटके उडत असत. रविवारी दोघेही कानगोष्टी करताना दिसून आल्याने अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले.सामना आम्हीच जिंकणार...लोकार्पण सोहळ्याच्या वेळी पहिल्याच चेंडूवर महापौर नंदकुमार घोडेले यांचा त्रिफळा उडाला. नंतर महापौर आपले मनोगत व्यक्त करीत असताना आ. अतुल सावे यांनी सेना-भाजप नगरसेवकांचा सामना ठेवा, अशी सूचना केली. यावर महापौर म्हणाले पिचवर माझी विकेट पडली तरी राजकारणात मी सेफ आहे. युतीचा सामना ठेवल्यास सेनेचेच नगरसेवक जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मनपाच्या पिचवर आले बकोरिया!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:34 AM