औरंगाबाद : बुडीत कर्ज हे देशाच्या विकासातील मोठा अडसर असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे सहायक सल्लागार डॉ. रमेश गोलाईत यांनी बुधवारी येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागात डॉ. गोलाईत यांचे ‘जी-२० आणि बँकिंग क्षेत्रातील संधी’ या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. विनायक भिसे होते. डॉ. गोलाईत म्हणाले की, रिझर्व्ह बँकेने बँकिंग क्षेत्राच्या विकासासाठी तयार केलेल्या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे केल्यास बँकांचे बुडीत कर्ज राहिले नसते, मात्र आपल्या देशातील राजकीय व्यवस्थेमुळे रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येते. याचा परिणाम बुडीत कर्ज वाढण्यावर होतो.पर्यायाने हेच बुडीत कर्ज देशाच्या विकासात अडसर निर्र्माण करीत आहे. जागतिक मंदीमध्येही भारताचा विकास २०१० पासून योग्य पातळीवर ठेवण्यात यश मिळाले आहे. विकसित देशांची घसरगुडी होत असताना भारताने प्रगती साध्य केली, हे कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले. अध्यक्षीय समारोपात डॉ. भिसे यांनी विभागाच्या गौरवशाली परंपरेची माहिती सांगितली. प्रास्ताविक प्लॅनिंग फोरमच्या प्रमुख डॉ. कृतिका खंदारे यांनी केले. पांडुरंग दाभाडे याने सूत्रसंचालन के ले तर मधुकर काळे याने आभार मानले.यावेळी डॉ. धनश्री महाजन, डॉ. सुनील नरवडे, डॉ. अशोक पवार, डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांची मंचावर उपस्थिती होती.
बुडीत कर्ज देशाच्या विकासातील अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2016 11:49 PM