औरंगाबाद : हाताळून हाताळून खराब झालेल्या नोटा ग्राहक बँकांमध्ये जमा करतात. या थोड्या थोड्या नोटा मिळून बँकामध्ये मागील ८ महिन्यांत ढिगार निर्माण झाला आहे. तब्बल १०० कोटी रुपये मूल्याच्या खराब नोटांची आजघडीला बँकांच्या करन्सी चेस्टमध्ये थप्पीवर थप्पी लागली आहे. ही आकडेवारी एका जिल्ह्यातील आहे. असे देशभरातील बँकांमध्ये यंदा किती खराब नोटा जमा झाल्या असतील, याची आकडेवारी रिझर्व्ह बँकेने अजून जाहीर केली नाही.
या खराब नोटांमध्ये २ हजार, ५०० रुपये, २०० रुपये, १०० रुपये, ५० रुपये, २० रुपये व १० रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. यातही १०० रुपये, १० रुपये, व ५ रुपयांच्या नोटा सर्वाधिक आहेत.
एसबीआयच्या करन्सी चेस्टमध्येच सुमारे ९० कोटींच्या खराब नोटा जमा आहेत. त्यातील ३४ कोटी ६० लाख रुपयांच्या खराब, जीर्ण नोटा मागील महिन्यात रिझर्व्ह बँकेला पाठविण्यात आल्या आहेत.
स्वच्छ नोटा हे रिझर्व्ह बँकेचे धोरण आहे. प्रत्येक बँकेला ग्राहकांकडील खराब नोटा घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. पण काही बँका आपली जबाबदारी झटकून खातेदारांना खराब नोटा बदलण्यासाठी एसबीआयकडे पाठवत असल्याचे दिसून आले. बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेच्या अधिकारी संपूर्ण खराब , जीर्ण नोटांचा पंचनामा करतात व त्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे पाठवतात. त्या नोटा परत चलनात येऊ नये म्हणून त्या जाळून टाकण्यात येतात.
चौकट
१० कोटींची नाण्याची थप्पी
बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, १० रुपये मूल्याची नाणी ग्रामीण भागात अजूनही स्वीकारण्यास नकार दिला जात आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी जाहीर केले आहे की, १० रुपयांची नाणी चलनात आहे. ग्राहक नाणी बँकेत आणून देतात पण घेऊन जात नाहीत. यामुळे एसबीआयकडे १० कोटी मूल्यांची नाणी बँकेत धूळ खात आहे.