परतूर : नगर पालिकेने शहरातील पोस्टर, बॅनर व रोडवरील बांधकाम साहित्य हटवण्याची कारवाई केली. दरम्यान ही कारवाई दंगलीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे.शहरात कोठेही विना परवानगी पोस्टर व बॅनर लावणे नियमबाहय आहे. तसेच रोडवर बांधकाम साहित्य टाकणे हे ही धोकादायक व नियम बाह्य आहे. मात्र नगरपालिकेचे बोटचेपे धोरण यास कारणीभूत आहे. शिवजयंती दरम्यान जी दगडफेक झाली या वादाच्या ठिणगीचे कारण व दगडफेकीसाठी आयतेच रोडवर विटा, दगड सापडणे हे ही या घटनेची तीव्रता वाढवण्यास कारणीभूत ठरले आहे. मलंगशहा चौकात विटाचा ढिगारा पडलेला होता. अनेक वेळा शहरात पुढाऱ्यांच्या वाढदिवसांचे, विविध जयंती उत्सव यांचे बॅनर पोस्टर व पताका रोडवर अडकवले जातात. याकडे नंतर कोणीच लक्ष देत नाही. यामुळे बऱ्याचदा तणावही निर्माण होतो. नगरपालिका व पोलिसांनी मिरवणुकीच्या मार्गातील अशा बाबी कि ंवा अडथळे अगोदरच पाहणी करून दूर करणे आवश्यक असते. मात्र राजकीय दबाव, हितसंबंध, कारवाई कोणी करायची या टाळाटाळीतून शहर बटबटीकरणाचे प्रमाण वाढले आहे. शहरात अतिक्रमणेही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पालिकेने धडक कारवाई करण्याची गरज आहे. पालिकेच्या नावे असलेल्या जमिनी हडप होत आहे. याकडे कोण लक्ष देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील या प्रकाराबद्दल पोलीस अधीक्षकांनी कानउघाडणी केल्यानंतर पोलीस बंदोबस्त घेऊन नगर पालिकेच्या पथकाने शहरातील बॅनर पोस्टर व बांधकाम साहित्य हटवण्याची मोहीम हाती घेतली. पोलिसांची व्हॅन घेऊन शहरातील हे पोस्टर, बॅनर, पताका व काही अतिक्रमण हटवण्यात आले.
परतूर पालिकेने शहरातील बॅनर्स हटविले
By admin | Published: February 21, 2017 11:59 PM