औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीने आज पुन्हा एकदा शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे व फुलंब्रीचे आमदार व महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यामुळे टीव्ही सेंटरवर जमलेल्या प्रचंड जनसमुदायाचे मात्र मनोरंजन झाले. सिडको- हडको या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच आज खा. खैरे हे बोलायला उठले, तेव्हा त्यांना वीस वर्षांचा हिशेब द्या, असा जाब पब्लिकमधूनच विचारला गेला. त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि ‘काय केले ... काय केले’ असा आवाज वाढला. त्यावर खैरे चिडलेही आणि म्हणाले, येतो तिकडं मी. जरा थांबा’ मात्र आपल्या भाषणात त्यांनी विचारलेल्या सवालाला उत्तर दिले नाही.
गेल्या काही दिवसांपासून खैरे व बागडे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. राजाबाजार येथील एका छोट्या कार्यक्रमात खा. खैरे यांनी बागडे यांच्यावर टीका करून डिवचले. विधानसभेचे अध्यक्ष असले तरी हरिभाऊ बागडे गप्प कसे बसतील. क्रांतीचौकातील मनपाच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीतच बागडे यांनी खैरेंची खरडपट्टी केली. शंभर कोटींच्या रस्ते कामाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे खैरे हे आज अध्यक्ष होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी खैरे की बागडे यावरूनही वाद रंगला होता.
आज बागडे बोलल्यानंतर अध्यक्ष म्हणून खैरे बोलले. त्यानंतर मुख्यमंत्री बोलले. त्या दिवशी आदित्य ठाकरे यांच्यासमोर आणि आज मुख्यमंत्र्यांसमोर बागडे यांनी खैरेंवर टीका करण्याची संधी सोडली नाही. कानपिचक्या देत देत, बागडे म्हणाले, मनपाचे इथले सगळे पदाधिकारी बरं काम करतात. चांगलं काम करतात. पण खैरे त्यांना फ्री हँड देत नाहीत. पदाधिकाऱ्यांनी छोट्या छोट्या गोष्टीही विचारून कराव्या अशी वेळ त्यांच्यावर आणून सोडतात.’ अर्थात ही टीका खैरेंना झोंबली व त्यांनी बागडे यांच्या वयाचेही भान न ठेवता जोरदार हल्ला चढवला.‘तुमचा मतदारसंघ तिकडे बाजूला आहे. शहरही माझा मतदारसंघ आहे. त्यामुळे मला महापालिकेतही लक्ष घालावे लागते. अशा शब्दांत खैरेंनी बागडे यांच्यावर पलटवार केला.
यावरच खैरे थांबले नाहीत. ते म्हणाले ‘मी नॅशनल लीडर आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांचे शिवसेनेचे काम बघतो. यांच्यासारखा मी नाही’ असा टोला त्यांनी मारला. दोघांचे हे वाक्युद्ध ऐकल्यानंतर सेना -भाजपमध्ये निदान जिल्ह्यात तरी आलबेल नसल्याची कुजबुज उपस्थितांमध्ये ऐकू आली.