छत्रपती संभाजीनगर : भारतीय बौद्ध महासभेने देशातील २४ राज्यांत धम्मक्रांतीला गती दिली आहे. हा कारवा जोमाने पुढे जात असून त्यास छुपा विरोध होत आहे. एकोप्याने चालणारा हा देश गेल्या दहा वर्षांत ठरवून बदलण्यात आला. आता बहुजनांना हे चित्र बदलावे लागेल. विषमता पसरविणाऱ्यांना विरोध करा, संविधानाला मानणारे लोक सत्तेत बसविण्याचा आपण सर्वांनी निर्धार करावा, असे आवाहन बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी केले.
नागसेन वनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात रविवारी बौद्ध धम्म व समता सैनिक दलाचे विभागीय अधिवेशन झाले. या अधिवेशनाचे उद्घाटन भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड. एस.के. भंडारे, प्रा. बापू गायकवाड, डी.एम. आचार्य, सुशील वाघमारे, भिकाजी कांबळे, स्वाती शिंदे आदी पदाधिकाऱ्यांची विचारमंचावर उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष किशोर जोहरे अध्यक्षस्थानी होते. सुरुवातीला ध्वजवंदन व समता सैनिक दलाचे प्रभावी संचलन झाले. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतून उपासक, उपासिका व समता सैनिक दलाचे जवान हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
आंबेडकर यावेळी म्हणाले, मराठवाडा ही बौद्ध धम्माचा वारसा असलेली ऐतिहासिक भूमी आहे. अजिंठा लेणीला शनिवारी भेट दिल्यानंतर तिथे पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बोललो. बुद्ध लेणींमधील अतिक्रमणे रोखा. विदेशातून येणारे ७० टक्के पर्यटक बौद्ध देशातून येतात. विदेशी चलन मिळण्यासाठी हा वारसा जपला पाहिजे. अल्पसंख्याक बौद्ध, जैन आणि इस्लाम धर्माच्या अनुयायांनी या देशाला भरभरून दिले आहे. बौद्ध धम्माकडे मोठ्या प्रमाणात आदिवासी आकर्षित होत आहेत. ओबीसी देखील मोठ्या संख्येने धर्मांतरीत होत आहेत. त्यामुळेच जनगणना पुढे ढकलली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी विरोध केला आज तिच मंडळी सत्तेत बसली आहे. विषमता ठासून भरली जात असून सत्ताधारी त्यास उत्तेजन देत आहेत. शिक्षणाचे खाजगीकरण केले जात आहे. बहुजन शिकूच नये, ही त्यामागची भूमिका आहे. येणाऱ्या निवडणुकीनंतर शिक्षण आणि कामगारांचा कायदा अमलात आणला जाणार आहे. त्यामुळे ओबीसींना देखील अशा प्रवृत्तीला सत्तेवरून पाय उतार करण्यासाठी सिद्ध व्हावे लागेल. यावेळी मान्यवरांनी मनोगताद्वारे सत्ता परिवर्तनासाठी सिद्ध होण्याचा निर्धार व्यक्त केला.