छत्रपती संभाजीनगर : सलग चार वर्षे अथक प्रयत्नांनंतर आगीच्या झळा सोसून ड्रोंगो अर्थात कोतवाल पक्ष्याचा अत्यंत दुर्मीळ क्षण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वाइल्डलाइफ छायाचित्रकार बैजू पाटील यांनी कॅमेऱ्यात टिपला आणि तोच फोटो आता जागतिक स्पर्धेत ८,८०० फोटोंमध्ये अव्वल ठरला. ‘विंग्ज ऑन फायर’ या बर्ड कॅटेगरीतील या छायाचित्राला जगातील पहिले पारितोषिक मिळाले, तर जागतिक स्तरावरील ‘एफआयआयएन’ हा पुरस्कारही मिळाला.
पोर्तुगाल गाला येथे नुकताच पुरस्कार सोहळा पार पडला. बैजू पाटील हे मागील ३७ वर्षांपासून या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करत आहेत. वाइल्डलाइफ क्षेत्रातील अतिशय दुर्मीळ, असे क्षण त्यांनी कॅमेऱ्यात टिपले आहेत. त्यांना आजवर १३२हून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पर्धांत पुरस्कार मिळाले आहेत.
ज्वाळांचा भडका अन् भक्ष्यावर लक्ष
हा फोटो बैजू यांनी बीड जिल्ह्यातील धारूर येथे दुर्गम भागात जाऊन काढला आहे. या भागात ऊसतोडणी नंतर उरलेले पाचट शेतकरी जाळतात. तेव्हा परिसरात प्रचंड धूर पसरतो. हा धूर पाहून ड्रोंगो या दिशेने उडून येतात. आग लावल्यामुळे पाचटावरील असंख्य किडे हवेत उडू लागतात. हे किडे ड्रोंगोचे भक्ष्य असल्याने तो किड्यांना पकडण्यासाठी ज्वाळांमधून मार्ग काढत त्यांच्याकडे झेपावतो. दिवस उजाडतो तेव्हा किंवा मावळतीला बऱ्याचदा हे चित्र पाहायला मिळते. किडे पकडण्याची ही क्रिया पापणी झाकून उघडेपर्यंत पूर्ण होत असल्याने त्याचा फोटो मिळणे तसे फार अवघड असते.
फोटो घेताना शूजचे सोलही जळाले...
आगीच्या ज्वाळा भडकल्या असतानाही ड्रोंगो जेव्हा भक्ष्य पकडण्यासाठी त्याच्याकडे झेप घेतो, तो क्षण टिपणे सोपे नव्हते. यासाठी बैजू यांनी आधी अभ्यास तर केलाच पण स्वत: त्यांना आगीच्या झळा सोसाव्या लागल्या. झळा लागून कॅमेरा मध्येच गरम व्हायचा. हा फोटो घेण्याच्या प्रयत्न करत असताना बैजू यांच्या बुटाचा सोल पूर्णपणे आगीत जळून गेला व पायाला चटके बसले.
लोकमत समूहाने माझे ‘वाइल्ड स्टेप’ नावाने पुस्तक काढले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्या प्रकाशन सोहळ्यास प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आले होते. यासह माझ्या विविध उपक्रमांना, फोटोग्राफीला लोकमत समूहाचे चेअरमन आदरणीय डॉ. विजयबाबू दर्डा यांचे कायमच प्रोत्साहन, पाठिंबा राहिला आहे.- बैजू पाटील, प्रसिद्ध छायाचित्रकार