औरंगाबाद : गाई, म्हशी व शेळी यांची खरेदी विक्रीमध्ये गुंतवणुक केल्यास दाम दुप्पटीने परताव्याचे आमिष दाखवून देशातील लाखो ठेवीदारांची कोटयवधींची फसवणूक करणा-या समृध्द जीवन फुडस इंडिया लिमीटेड व समृध्द जीवन मल्टी स्टेट को-ऑपरेटीव्ह संस्थेचा मुख्य सुत्रधार महेश मोतेवार याला मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती एस. जी मेहरे यांच्या न्यायालयाने बीड शहर पोलीस स्टेशन मध्ये दाखल एका गुन्ह्यात जामीन अर्ज मंजुर केला.
मोतेवार याच्या विरोधात बीड येथील गुन्हयामध्ये १२३२ ठेवीदारांना फसवून सुमारे २० कोटी रूपयांची फसवणूक केल्याचे दोषारोपपत्र पोलीसांनी दाखल केले होते. पोलीसांनी या गुन्ह्यात मोतेवारला १८ नोव्हेंबर २०२१ रोजी अटक केली होती व राजकोट येथील कारागृहामध्ये ठेवले होते. बीडच्या सत्र न्यायालयाने मोतेवार यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने अॅड. प्रसाद जरारे यांच्या मार्फत खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला होता.सीबीआयने २०१० ते २०१५ या कालावधी मधील व्यवहारांच्या केलेल्या तपासामध्ये मोतेवारच्या कंपनीने ३५ लाख ठेवीदारांकडुन पैसे जमा करून सुमारे ३४०० कोटी पेक्षा जास्त फसवणुक केल्याचे दोषारोप पत्रामध्ये नमुद केले आहे.
या गुन्ह्यात केंंद्रीय अन्वेषण विभागाने केलेल्या तपासाच्या अनुषंगाने मोतेवारची संपुर्ण मालमत्त्ता व बॅक खाते गोठविले आहे़ सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण घोटाळा व मोतेवारच्या सर्व कंपन्यांचा तपास सीबीआय ने करावा असे आदेशीत केल्यामुळे बीड पोलीसांनी स्वतंत्र तपास करून मोतेवारला जेरबंद ठेवणे कायदयाच्या दृष्टीने चुकीचे असल्यामुळे त्याला जामीनावर मुक्त करावे असा युक्तीवाद उच्च न्यायालयात करण्यात आला.
इतर गुन्हयांमध्ये मोतेवारला सर्वोच्च न्यायालय व इतर उच्च न्यायालयाने जामीन दिलेला आहे हे उच्च न्यायालयाने आपल्या आदेशामध्ये नमूद केले आहे. मोतेवारच्यावतीने सर्वोच्च न्यायालयाचे ॲड. सुरेश त्रिपाटी व अॅड प्रसाद जरारे यांनी बाजु मांडली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने अॅड व्ही एस बडाख यांनी काम पाहिले.